मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रात पुन्हा ढगांचा गडगडाट, गणेशोत्सवासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांनो सावधान

महाराष्ट्रात पुन्हा ढगांचा गडगडाट, गणेशोत्सवासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांनो सावधान

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

राज्यातील काही भागांमध्ये पुढच्या काही तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबतचा इशारा दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 31 ऑगस्ट : महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. पावसाने आराम घेतल्याने राज्यातील पावसाळा लवकर संपणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण राज्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. विशेष म्हणजे राज्यभरात आज गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. या उत्साहात पावसाच्या रिमझिम सरींनी बरसत गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला रिमझिम वाटणारा याच पावसाने आता आक्रमक रुप घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पुढच्या काही तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबतचा इशारा दिला आहे. विशेषत: मुंबईसाठी हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईत गणेशोत्सवाचा एक वेगळाच आनंद असतो. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होतो. शेकडो गणपती मंडळ गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करतात. विशेष म्हणजे मुंबईकर प्रचंड मोठ्या प्रमाणात या मंडळातील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. यामध्ये लालबाग, चिंचपोकळी, खेतवाडी भागात नागरिकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. तुम्ही देखील मुंबईत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जात असाल तर आधी पावसाचा अंदाज घ्या. कारण मुंबईतल्या पावसामुळे तुमची कदाचित गैरसोय होऊ शकते.

(अब्दुल सत्तारांच्या हाती भगवा झेंडा, सिल्लोडच्या गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी, Video)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार तासांमध्ये विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वेळी वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 किमी असा असणार आहे. या दरम्यानच्या काळात काही ठिकाणी कदाचित हलक्या स्वरुपात गारा देखील पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी

राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावले. राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास अनेक गावांना जोरदार पावसाने झोडपले. मागील पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. लाडक्या बाप्पाच्या आगमनासोबत वरूण राजानेही हजेरी लावल्याने बळीराजा शेतकरी सुखावला आहे. पावसाअभावी जिरायती भागातील करपू लागलेल्या पिकांनाही आता जीवदान मिळणार आहे.

पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले

गणेश चतुर्थीच्याच दिवशी मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढले. अचानक दुपारी पावसाला सुरुवात झाल्याने गणेश भक्तांची एकच तारांबळ उडाली. विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी भागातील वीज गायब झाल्याने जिल्हा अंधारात गेला. वीजपुरवठाच गायब झाल्याने वीजवितरणच्या यंत्रणेचे तीन तेरा उडाले. जिल्ह्यातील वीज गायब झाल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

मावळमध्येही पाऊस

मावळात गणेश चतुर्थीच्या दिवशी वरून राजाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गणपती बाप्पाला घरी घेऊन जाणाऱ्या गणेश भक्तांची तारांबळ उडाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. आज पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळालाय. तर पावसाच्या सरीने श्री गणेशाचं स्वागत केलंय.

प्रदीर्घ विश्रांतीनंतर औरंगाबादमध्ये पावसाची हजेरी

प्रदीर्घ विश्रांतीनंतर शहरामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली. त्यामुळे औरंगाबादवासियांची आता उकड्यातून सुटका होणार आहे. मागील दोन दिवसांमध्ये शहराच्या तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली होती. मात्र आता पावसामुळे यामध्ये बदल होणार आहे. तर पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यातील शेतीतील पिकांवर मोठा परिणाम झाला होता. बऱ्याच ठिकाणी शेती पिकांना सिंचनाच्या साह्याने पाणी देण्यास शेतकऱ्यांनी सुरुवातही केली होती. खडकाळ जमिनीवर आणि पाण्याची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र शहराप्रमाणे जिल्हाभरात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेती पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे.

जालन्यात गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाचं आगमन

जालन्यात गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाचं आगमन झालं. शहरात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचं आगमन झालं. अचानक आलेल्या पावसाने गणेशभक्तांची तारांबळ उडाली. ढोल पथकाच्या वादकांनी रामदेव बाबा मंदिराचा आसरा घेतला. बाप्पाच्या मूर्तीला ताडपत्री आणि छत्रीचा आडोसा देण्यात आला होता.

First published:

Tags: Maharashtra rain updates, Mumbai rain, Rain