200 कोटींचा 'एकटा' मालक.., मृत्यूनंतर पोलिसांना शोधावा लागला 'वारस'

200 कोटींचा 'एकटा' मालक.., मृत्यूनंतर पोलिसांना शोधावा लागला 'वारस'

200 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असलेल्या व्यक्ती गेल्या 2 वर्षांपासून रुग्णालयात होता. आता मृत्यूनंतर पोलिसांनी शोधाशोध करून त्याच्या मुलांना याबाबत माहिती दिली.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 200 कोटींच्या संपत्तीचा मालकाचा बुधवारी निमोनियाने मृत्यू झाला.नेपियन सी रोड इथं 200 कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या निखिल झवेरी गेल्या 2 वर्षांपासून रुग्णालयात होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील एकही व्यक्ती तिथं उपस्थित नव्हता. पोलिसांनी बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांच्या मुलाशी संपर्क झाला. त्यानंतर झावेरी यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. याबाबतचे वृत्त 'मुंबई मिरर'ने दिलं आहे.

निखिल झावेरी गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त होते. सहा वर्षांपूर्वी कांदीवली येथून निखिल बेपत्ता झाले होते. त्यावेळी बोरीवली पोलिस ठाण्याच्या आवारात ते सापडले होते. त्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या आश्रमात त्यांना पाठवण्यात आलं होतं. जानेवारी 2014 मध्ये त्यांची ओळख पटली होती. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये रुग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हापासून 2017 पर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते.

रुग्णालयात तीन वर्षे उपचार झाल्यानंतर न्यायालयानं त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच झावेरींच्या संपत्तीबाबत कोणताही निर्णय घेण्यास कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला अधिकार नसतील असं सांगत संपत्तीच्या सुरक्षेसाठी एका व्यक्तीची नियुक्ती कऱण्यात आली. त्यानंतर झावेरी दोन वर्षांपासून जेजे रुग्णालयात असून त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती त्यांना पाहण्यासाठी आला नाही. झावेरी यांचे आता पर्यंत दीड लाख रुपयांचे बिल देणे बाकी असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.

झावेरी यांची दोन लग्न झाली होती. दोन्ही पत्नींशी त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा एक मुलगा असून तो सध्या परदेशात राहतो. झावेरी यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मुलाशी संपर्क साधला आहे. तो परदेशात असून वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी मुंबईत पोहचण्याची शक्यता आहे.

झवेरी यांच्या संपत्तीवरून त्यांची माजी पत्नी, मुलगा आणि त्यांच्या बहिणींचे पती यांच्यात वाद आहे. झवेरी यांची पहिली पत्नी दिप्ती पांचाल यांनी त्यांच्या संपत्तीवर दावा केला आहे. त्यावर सध्या परदेशात असलेल्या मुलानं पांचाल यांच्याविरुद्ध वडीलांची खोटी सही घेऊन मृत्यूपत्र तयार करून घेतल्याची तक्रार केली होती. याशिवाय पांचाल यांची मदत केल्याबद्दल झवेरी यांच्या तीन बहिणींचे पती मुरली मेहता, नितिन पारेख आणि शैलेश पारेख यांच्याविरुद्धही तक्रार दाखल केली होती. सध्या मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग याचा तपास करत आहे.

VIDEO: पवारांच्या वयावरून मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, दिलं 'शोले'चं उदाहरण

Published by: Suraj Yadav
First published: October 18, 2019, 3:05 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading