मुंबई हायकोर्टानं बदलला ठाकरे सरकारचा आदेश, अखेर 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी

मुंबई हायकोर्टानं बदलला ठाकरे सरकारचा आदेश, अखेर 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी व्यक्त केली होती नाराजी

  • Share this:

मुंबई, 7 ऑगस्ट: मुंबई हायकोर्टानं 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगपासून रोखण्याचा ठाकरे सरकारचा आदेश शुक्रवारी रद्द बातल ठरवला.  65 वर्षावरील कलाकार, टेक्निशियन आणि संबंधितांना कामाची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्र सरकारने बॉलिवूडच्या शूटिंग संबंधित गाईडलाइन जारी केली होती. मुंबई हायकोर्टाने सरकारच्या गाईडलाइनमध्ये बदल करून 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी दिली आहे.

हेही वाचा...Sushant Singh Rajput Case : सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी सुरू

राज्य सरकार एका ज्येष्ठ नागरिकाला आपलं दुकान उघडण्यास आणि दिवसभर बसण्यास थांबवत नसेल तर सध्याच्या लॉकडाऊनमध्ये ते कोणत्या आधारावर 65 वर्षांवरील वयाच्या कलाकारांना शूटिंगला येऊ देण्यास का थांबवत आहेत, असा सवाल देखील मुंबई हायकोर्टानं याआधी महाराष्ट्र सरकारला केला होता.

लॉकडाऊनच्या काळात शूटिंगबाबत महाराष्ट्र सरकारने गाईडलाइनसोबत शूटिंगला परवानगी दिली होती. मात्र, 65 वर्षांवरील कलाकार, टेक्निशियन आणि डायरेक्टर तसेच कोणत्याही क्रिएटिव्ह व्यक्तीला शूटिंगसाठी सेटवर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. यानंतर या मुद्द्यावरून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्येष्ठ कलाकार शूटिंगच्या सेटवर नसतील तर काम पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या गाईडलाईनमध्ये बदल करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

मात्र, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारची गाईडलाइन असल्याचं सांगून याप्रकरणातून अंग झटकलं होतं. यानंतर प्रोड्यूसर फेडरेशनने मुंबई हायकोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगपासून रोखण्याचा सरकारचा निर्णय रद्द ठरवला आहे. 65 वर्षावरील कलाकार, टेक्निशियन आणि संबंधितांना कामाची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा...मुंबई पोलिसांना सणसणीत चपराक, सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी CBI कडून गुन्हा दाखल

सरकारची ही वृत्ती भेदभाव करणारी

शारीरिकदृष्ट्या निरोगी, 65 वर्षांहून अधिक वयाच्या कलाकारांना शूटिंगपासून रोखण्याचा आणि अशाप्रकारच्या कामांसाठी बाहेर जाण्यापासून रोखण्याचा राज्याचा निर्णय हा 'भेदभाव' असल्याचे दिसून येते. अशी बंदी कोणत्या आधारावर लागू केली गेली आहे, हे स्पष्ट करण्यासाठी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

Published by: Sandip Parolekar
First published: August 7, 2020, 1:10 PM IST

ताज्या बातम्या