वादग्रस्त पुस्तकाच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आज राज्यव्यापी आंदोलन

वादग्रस्त पुस्तकाच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आज राज्यव्यापी आंदोलन

भाजपचे कार्यकर्ते भगवान गोयल यांनी प्रकाशित केलेल्या 'आजके शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या निषेधार्थ आज कॉंग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी: भाजपचे कार्यकर्ते भगवान गोयल यांनी प्रकाशित केलेल्या 'आजके शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या निषेधार्थ आज कॉंग्रेसकडून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला जाणार असल्याचं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

'आजके शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर देशभरात भाजपविरोधात लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. हा शिवाजी महाराजांचा अवमान असून मुंबईबरोबरच राज्यातील जिल्हा व तालुका स्तरावर कॉंग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असं थोरात यांनी सांगितलं. काल सोमवारी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील आझाद मैदानात 'आजके शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांनी लेखक भगवान गोयल यांच्या प्रतिमेचे दहन करुन निषेध व्यक्त केला.

मात्र या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नसून या पुस्तकात लेखकाचं वैयक्तिक मत असल्याचं भाजपचे माध्यम सहप्रभारी संजय मायुख यांनी सांगितलं. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात या पुस्तकाचे प्रकाशन होऊ देणार नसल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही करता येणार नसल्याचं ते म्हणाले.

Published by: Akshay Shitole
First published: January 14, 2020, 10:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading