मुंबई, 3 जून : शाळा म्हटलं की, ती इंग्लिड मेडियमची (English medium school) असावी, त्यात केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची असावी, असा पालकांचा अट्टाहास असायचा. कारण, आजच्या स्पर्धेच्या युगात त्याच शाळा मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतात, त्यांना टिकवून ठेऊ शकतात, असा पालकांचा ठाम विश्वास. यामुळे महापालिकेच्या शाळांना किंवा एकूणच शासकीय शाळांची पटसंख्या मागील काही वर्षात कमी झाली. आता हे चित्र बदलंल आहे. यंदा पालिकेच्या शाळांमध्ये (BMC School Admission) 35 हजार विद्यार्थींनी प्रवेश घेतला आहे. सोयी सुधारणा केल्यामुळे पालिकेच्या शाळांना पालकांची पसंती मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
पटसंख्या कमी असल्यामुळे शासकीय शाळांना इतरही अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. परंतु, यंदा हे चित्र बदललेलं दिसून येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यंदा CBSE आणि ICSI यांच्या प्रवेश क्षमतेला मागे टाकत मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी होत आहेत.
आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार सुमारे 35 हजार विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेला आहे. प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू असून हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये विद्यार्थी आणि पालकाची इंग्रजी शाळांना सर्वाधिक पसंती असल्याचे आढळून आले आहे. तर, याबाबत महापालिकेने केलेल्या सुधारणा जसे की, इमारतींची डागडुजी, पायाभूत सोयी तसेच शैक्षणिक कामकाजात केलेले बदल, यामुळे यंदा प्रवेश वाढले आहेत, असे मत पालिका अधिकाऱ्यांचे आहेत.
वाचा : शाळा आहे ही, खरं वाटेल? वाळवंटात मधोमध कुणी आणि कशी बांधलीये Photo पाहून व्हाल थक्क
शिक्षण मातृभाषेतून व्हावं की, इतर भाषेतून, शासकीय शाळांमधून व्हावं की, खाजगी... असे अनेक वाद असतात. सरकारी शाळांमध्ये कमी सोयी-सुविधा, तसेच शिक्षणाची गुणवत्ता कमी मिळायची म्हणून बहुतेक पालकांच ओघ खासगी शाळांकडे वळायचा. मात्र, खाजगी शाळा वाटेल तेवढी फी आकारायचे. आता मात्र सरकारी शाळांनी शिक्षणाची गुणवत्ता तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या पायाभूत सुविधांमध्ये आवश्यक बदल केल्यामुळे शासकीय शाळांनासुद्धा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे टाळेबंदीमधील झालेल्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळा-कॉलेज पूर्ववत होण्याच्या मार्गावर असताना हा एक सकारात्मक बदल नक्कीच म्हणावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.