मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबै बँक बोगस कर्ज वाटप प्रकरण: प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ, गुन्हे दाखल करण्याचे आदेश

मुंबै बँक बोगस कर्ज वाटप प्रकरण: प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ, गुन्हे दाखल करण्याचे आदेश

प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आणि भाजपचे बीड जिल्ह्यातील विधान परिषद आमदार सुरेश धस (Suresh Dhas) अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पुणे, 07 मार्च: बोगस दस्तावेजांच्या आधारे 27 कोटींचं कर्ज वाटप केल्याप्रकरणी मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आणि भाजपचे बीड जिल्ह्यातील विधान परिषद आमदार सुरेश धस (Suresh Dhas) अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्यानं दिल्यानं खळबळ उडाली आहे

काय आहे आदेश

धस यांच्या जयदत्त ऍग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि. आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आलं आहे. तसंच त्यासाठी बोगस दस्ताऐवज तयार करण्यात आलं आहेत.

मुंबै बँकेने या कर्जप्रकरणात मोठी अनियमितता केलेली असून सर्व आर्थिक व्यवहार संशयास्पद आणि आर्थिक गैरवापर करण्याच्या उद्देशाने केल्याचे दिसून येत आहे. हितसंबंधित लोकांना कर्ज वाटप केलेले आहे. त्यामुळे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तावेजांच्या आधारे 27 कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररित्या वाटप केल्यामुळे कर्ज देणार आणि घेणार यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक आणि अनियमितता अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले आहेत.

प्रविण दरेकर यांची प्रतिक्रिया

आमच्या अडचणींचा बॉक्स फुल झालेला आहे. किती दंडेलशाहीने कारभार सुरू आहे. पहिली चौकशी होते आणि नंतर गुन्हा दाखल होतो. मात्र प्रत्यक्षात अस काहीही झालं नाही,असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबै बँकेसंदर्भात महाविकास आघाडीच प्रेम कमी झालं नाही. आमदार सुरेश धस यांना दिलेलं कर्ज हे योग्य आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख आत गेले यामुळे भाजपा नेत्यांच्या मागे लागले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील मुंबै बँकेनं कर्ज दिलं त्याची देखील चौकशी व्हावी, असंही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

First published:

Tags: Pravin darekar