धक्कादायक! पोलीस ठाण्यातच ASI ने केली आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं कारण

धक्कादायक! पोलीस ठाण्यातच ASI ने केली आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं कारण

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने ठाण्यातच गळफास लावून आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : चेंबूर इथं पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने ठाण्यातच गळफास लावून आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. लॉकडाउनच्या काळात सध्या पोलिसांवर मोठा ताण आहे. त्याच पार्श्वभूमीवर आत्महत्येची घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. संपत गाढवे असं आत्महत्या केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संपत गाढवे यांच्याकडे भांडारगृहाची ड्युटी देण्यात आली होती. सध्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त असल्याने ते बाहेर गेले होते. त्यावेळी सोमवारी बदली हवालदार आले असता गाढवे यांनी ठाण्यातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गाढवे यांचा मृतदेह खाली उतरवून त्यांना राजवाडी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

संपत गाढवे हे आजारी होते. त्यांना घशाचा कर्करोग होता अशी माहिती मिळते. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे. आपण आजाराला कंटाळून जीवन संपवत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

पोलिसांत सेवा बजावणाऱ्या गाढवे यांची सेवा निवृत्ती अवघ्या एका महिन्यावर आली होती. मे महिन्यात ते सेवेतून निवृत्त होणार होते. गाढवे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

हे वाचा : कुछ मीठा हो जाए! शुगर डाऊन झालेल्या आजोबांना पोलिसांनी घरी येऊन भरवला रसगुल्ला

 

First published: March 30, 2020, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading