जालना, 21 मे: राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) अर्थात ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचाही तुटवडा जाणवत असल्याने चिंता वाढली आहे. त्यातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी आपली खंत व्यक्त करत केंद्रापुढे हतबल असल्याचं म्हटलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं, म्युकरमायकोसिस रुग्णांवर 100 टक्के मोफत उपचार व्हावेत यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. मोफत औषध देण्यात येतील. एम्फोटेरेसिन बी नावाचं महागडं औषध आहे ते सुद्धा मोफत देण्यात येईल. म्युकरमायकोसिस रुग्णांना आर्थिक भूर्दंड पडू नये याची काळजी घेण्यात येत आहे. एम्फोटेरेसिन बी हे लिम्फोसोब फॉर्म हे रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि त्याचा पुरवठा अतिशय कमी आहे. त्यामुळे मी केंद्रात या फॉर्मसाठी आवश्यक पुरवठ्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारपुढे राज्य सरकार हतबल; पाहा काय म्हणाले राजेश टोपे pic.twitter.com/j6N2PRvYzb
— News18Lokmat (@News18lokmat) May 21, 2021
आम्ही उत्पादक कंपन्यांना ऑर्डर्स दिल्या आहेत. पण ते आम्हाला देऊ शकत नाही. कारण, वितरणाचे सर्व अधिकार हे केंद्राने आपल्याकडे घेतले आहेत. त्यांना जोपर्यंत वरून आदेश येत नाही तोपर्यंत ते पुरवठा करू शकत नाही. त्यामुळे एम्फोटेरेसिनच्या पुरवठ्याबाबत पूर्ण हतबलता निर्माण झाली आहे. मी इतकीच विनंती करेल की, एम्फोटेरेसिन राज्याला वितरण करून द्या असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
पोलिसांची कमाल! 18 महिन्याच्या मुलाला मास्क नीट न घातल्याबद्दल केला दंड, पावतीवर लिहिलं वडिलांचं वय
म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार
राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीस आजारावर उपचार करण्याच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
या आजारावरील उपचारामध्ये अँटीफंगल औषधे हा महत्वाचा भाग असून ती कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्याबरोबरच ती महाग देखील आहेत. ही औषधे शासनाच्या प्रचलित नियमानुसार विहीत कार्यपद्धती अनुसरून संबंधीत प्राधिकरणाकडून उपलब्ध करून घेण्यात यावीत व अंगीकृत रुग्णालयास पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra, Rajesh tope