रायगड, 18 फेब्रुवारी : रायगडावर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून विद्युत रोषणाई करण्यात आली. मात्र ही विद्युत रोषणाई करताना डिस्को लाइट वापरले गेल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती संतप्त झाले आहेत. राजसदराला अशा प्रकारची डिस्को लाइट लावणे म्हणजे ऐतिहासिक ठिकाणाचा अपमान असल्याची टीका संभाजीराजेंनी केली आहे.
'भारतीय पुरातत्त्व विभागाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल,' अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
'भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो,' अशी आक्रमक भूमिकाही संभाजीराजेंनी घेतली आहे.
The Archaeological Survey of India has got lighting installed at Raigad Fort, ostensibly to celebrate Shiv Jayanti falling on 19th of February.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 18, 2021
The effort is grotesque, cheap and an abuse of the great legacy which is marked by simplicity and rational approach.
(1/2) pic.twitter.com/Lui22Kh08C
विद्युत रोषणाई आणि खासदार श्रीकांत शिंदे
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडला भेट दिली होती. यावेळी रायगडवरील महत्त्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने त्यांनी पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. रायगडवर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली.
त्यावेळी विद्युत रोषणाई करण्यासाठी आवश्यक फंड नसल्याचे यादव यांनी सांगितले. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी जो काही फंड लागेल तो मी देतो, मात्र रायगड अंधारात ठेवू नका, अशा सूचना केल्या. त्यानुसार मागणीचे पत्र श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्त्व विभागाला दिले. या मागणीवर पुरातत्त्व विभागाने तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार बुधवारी रायगडवर डॉ. शिंदे यांच्या मार्फत विद्युत रोषणाईचे साहित्य पोहोच झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sambhajiraje chhatrapati