'आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होतोय', छत्रपती संभाजी राजेंची फेसबुक पोस्ट

'आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होतोय', छत्रपती संभाजी राजेंची फेसबुक पोस्ट

आयुष्याची स्वप्न डोळ्यासमोर असणाऱ्या एका तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात जिवंत पेटवलं गेलं.

  • Share this:

मुंबई,4 फेब्रुवारी: खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट लिहून हिंगटघाट येथील प्राध्यापिका जळीत प्रकरणी तिव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली आहे. 'माणूसपणाला काळीमा फासणारी घटना. हे वाक्य फार हलकं वाटेल, अशी घटना सोमवारी हिंगणघाट येथे घडली. त्या नराधमाचा एन्काऊंटर करण्याची मागणी लोक करत असतील तर ते समजण्यासारखे आहे. आयुष्याची स्वप्न डोळ्यासमोर असणाऱ्या एका तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात जिवंत पेटवलं गेलं. हा क्रुरतेचा कळस झाला. हे जरा अतिच होत आहे. आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होत आहे, असे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी लिहिले आहे.

'महाराष्ट्र कोणत्या दिशेला वाटचाल करत आहे? हाच का तो शिवरायांचा स्त्रीविषयक आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा महाराष्ट्र? हाच का तो शाहू फुले आंबेडकरांचा स्त्री पुरुष समानता ठेवणारा मानवतावादी, पुरोगामी महाराष्ट्र? हाच का तो परस्त्री सदा बहिणी- माया म्हणणारा साधू संतांचा महाराष्ट्र? आज जर महाराज असते, तर ह्या असल्या नराधमाला कोणती शिक्षा केली असती? हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लोकांना ते समजून जाईल. महाराष्ट्र पोलिसांनी हैद्राबाद पोलिसांचा आदर्श घ्यावा, अशी जनभावना तयार झाली आहे सध्या.

याशिवाय अश्या नरधमांच्यावर वचक बसणार नाही. आयुष्यात कुणा माता भगिनी कडे वाईट नजरेने बघण्याचं धाडसच काय, विचार सुद्धा मनात आला नाही पाहिजे. असं काही करण्याची गरज आहे. निर्भया असेल किंवा कोपर्डी च्या भगिनीला आज सुद्धा न्याय मिळलेला नाही. याची खंत आजही मनात आहे.' असे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्र सुन्न...

एकतर्फी प्रेमातून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदोरी चौकात सोमवारी (3 फेब्रुवारी) प्राध्यपिका जळीत प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेत प्राध्यापिका तरुणी 40 टक्के होरपळली असून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडितेची श्वसनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत आहे. तिच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या चेहरा आणि डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेला आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून पुढील 48 तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत आहे. कृत्रिम नलिका टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केला आहे. पण, अजून धोका टळलेला नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

काय आहे घटना?

एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चेहऱ्यावर पेट्रोल ओतल्यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये तिचा चेहरा संपूर्ण जळाला असून, वाचाही गेली आणि दृष्टीदेखील गेली असल्याची खळबळजनक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी विकेश नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्य काय ते अजून बाहेर यायचे आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली हिंगणघाटात दाखल झाले असून या प्रकाराने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

आरोपी विकेश नगराळे याला हिंगणघाटच्या कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला रात्रभर समुद्रपूर पोलिस ठाण्यात ठेवले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला होता.

First Published: Feb 4, 2020 09:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading