मुंबई 25 मे : मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील नागरिक या उकाड्याने अक्षरशः हैराण झाले आहेत. राज्यात शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही मान्सूनची आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढील दोन दिवसात मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सूनचे संकेत मिळाले आहेत. कोकणात दोन दिवसांत म्हणजेच 27 मेपर्यंत मान्सूनपूर्व पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. यामुळे राज्यात सात जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून 7 जूनपर्यंत पोहोचणार आहे. विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल. हे वादळ मान्सूनला रोखणारे आहे, असा स्कायमेटचा अंदाज आहे. परंतु भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे प्रगती अशीच राहिल्यास केरळमध्ये 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो आणि यामुळे राज्यातही 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल.
यंदा पावसावर ‘अल निनो’चं सावट
मान्सूनबाबत सकारात्मक बातमी समोर आलेली असतानाच आता एक काळजी वाढवणारी बातमीही समोर आली आहे. यंदाच्या मान्सूनवर ‘अल निनो’चा प्रभाव असेल असा इशारा IMD कडून देण्यात आला आहे. ज्यामुळं यंदाच्या वर्षी सामान्य असणारा मान्सून त्यापेक्षाही कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Rain, Weather Update