मुंबई, 23 ऑक्टोबर : महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला मान्सून अखेर परतीच्या प्रवासाला निघाला असल्याचं IMD ने नोंदवलं आहे. पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून मान्सूनची माघार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. पुढच्या आठवड्यात राज्यात बहुतेक ठिकाणांहून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे.असं असलं तरी पाऊस थांबणार नाही. लगेचच ईशान्य मोसमी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याने त्याचे परिणाम राज्यातही दिसू शकतील, असा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार 28 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून नैर्ऋत्य मोसमी पाऊस परत जाईल. त्यानंतर लगेचच ईशान्य मोसमी वाऱ्यांना अनुकूल वातावरण असल्याने या रीट्रीटिंग मान्सूनला सुरुवात व्हायची शक्यता आहे. दक्षिण भारतात प्रामुख्याने याचा प्रभाव जाणवेल. गेल्या आठवड्यातल्या धुवांधार पावसानंतर अजूनही दक्षिण भारतात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. बंगळुरू शहराला आज पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलं. अवघ्या काही तासांच्या पावसात रस्ते जलमय झाले आणि संध्याकाळीच शहरभर नाले वाहू लागले. त्याचे फोटो आणि VIDEO सोशल मीडियावर फिरत आहेत.
#WATCH: Rainfall triggers water logging in parts of Bengaluru; visuals from near Lalbagh Botanical Garden. #Karanataka. pic.twitter.com/AzVSyeOhSU
— ANI (@ANI) October 23, 2020
पुढील 48 तासात महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून मान्सूनची माघार होणार असली, तरी परतीचा पाऊस मेघगर्जनेसह येईल, अशी शक्यता आहे. पुढचे दोन दिवस संपूर्ण कोकणपट्टी, मुंबई, ठाणे, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने कोकण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी Yellow Alert दिला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने सावध राहा, असा इशारा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Weather update, Weather warnings