परभणी 30 मे : यावर्षी पावसाचं आगमन थोड उशीरा होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. या अंदाजामुळे पेरणीसाठी तयार होत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरम निर्माण झालंय. तर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या आहेत. पेरणी करून पाऊस लवकर आला नाहीतर सर्व मेहनत आणि पैसे वाया जाण्याचीच शक्यता असते. त्यामुळे पाऊस आल्याशीवाय पेरणीला सुरूवात होण्याची शक्यता नाही. तर बाजारपेठांमध्येही वातावरण थंड आहे.
कापसाचं आगार असलेल्या परभणी जिल्ह्यात, पेरणीसाठी व्यापाऱ्यांनी आणि शेतकरी दोघांनी तयारी केलीय. मान्सूनपूर्व पावसाची वाट पाहिली जात आहे. त्याशिवाय पेरण्या सुरू होणार नसल्याने बाजारपेठेमध्ये निरव शांतता पसरलीय.
परभणी जिल्हा म्हणजे कापसाचा आगार, त्यामध्ये मानवत, पाथरी आणि सेलू या पट्ट्यामध्ये तर कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या वर्षी मान्सून चांगला येणार अशी बातमी सुरवातीला आल्यानंतर शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. पण काही दिवसांपूर्वीच हवामानाचा अंदाज आल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलं.
यामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडल्याशिवाय मशागतीच्या कामांनाच सुरवात होत नाहीय. त्यामुळे पेरण्यांना देखील उशिराच सुरवात होणार आहे. तर शेतकरी सध्या बियाणे बाजारातून गायबच झालाय. त्यात तुरळक शेतकरी खते खरेदीसाठी दुकानावर येतायत, बाजारात उपलब्द्ध असलेल्या बियाण्याची चौकशीही केली जातेय पण खरेदी मात्र पाऊस आल्यानंतर होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा धंदाही कमी होतोय.
व्यापाऱ्यांनीही बी-बियाणे आणि खतांची खेरदी केली आहे. भरपूर माल भरल्याने त्यांचे पैसे अडकले आहेत. खरेदी लवकर सुरू झाली तर व्यापाऱ्यांकडे पैसा खेळता राहतो. आधीचे पैसे देऊन नवा माल घेणं शक्य होतं. तर उशीरा खरेदी सुरू झाली तर पैसे अडकून पडतात असं मत अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं.
बियाणे आणि खतांची खरेदी सुरू झाल्यावरच मागणीचा अंदाज येतो आणि व्यापारी त्या प्रमाणात मालही बोलवत असतात. गेल्या काही वर्षांपासून मॉन्सून हा उशीरा येतो त्यामुळे शेतकरी पेरणीही उशीरा करतो. या आधी 6 ते 8 जूनच्या सुमारात हमखास पावसाचं आगमन होत असे. पावसाचं वेळापत्रक आता अनियमित झालं आहे.
दुष्काळामुळे सर्वच भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालीय. पाऊस आला तर शेतकऱ्यांची पाणी टंचाईपासून सुटका होईल आणि गुरांनाही चारा निर्माण होईल असं शेतकऱ्यांना वाटतं त्यामुळे सगळ्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत.