मुंबई, 05 जून: दक्षिणेकडील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे मागील आठवड्यात श्रीलंकेच्या आसपास मान्सूनचा (Monsoon) वेग मंदावला होता. त्यामुळे केरळात मान्सून (Monsoon in kerala) दाखल व्हायला तीन दिवस विलंब झाला. पण त्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग पकडला असून अवघ्या दोन दिवसांत मान्सून केरळातून महाराष्ट्रात धडकला आहे. हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजापेक्षा दोन दिवस आधीच मान्सूनने महाराष्ट्रात एन्ट्री (Monsoon arrive in Maharashtra) केली आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे याठिकाणी मान्सूनने आगमन केलं आहे. यानंतर मान्सून दक्षिण मध्य महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागाला मान्सून व्यापून टाकणार असल्याची सुधारित माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर 11 ते 15 जून दरम्यान पुणे आणि मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईकरांना मान्सूनच्या पहिल्या पावसाच्या आनंदासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
3 जूनला लक्षद्वीप आणि दक्षिण केरळात दाखल झालेला मान्सून पुढच्या काही तासांतच संपूर्ण केरळ आणि तामिळनाडूला व्यापत कर्नाटकच्या किनारपट्टीवर येऊन धडकला. यानंतर पुढील अवघ्या काही तासांत गोव्यासह कर्नाटकचा उर्वरित भाग, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि दक्षिण कोकणात मान्सूनने धडक मारली आहे. सध्या मान्सूनच्या आगमनाला पोषक वातावरण सध्या महाराष्ट्रात तयार झालं असून पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राला मान्सून व्यापून टाकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
चांगली बातमी मान्सूनची ..🌧🌧🌧 मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सून रेषा राज्यात, द.कोकणात हर्णे पर्यंत, द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाडा काही सलग्न भाग... परीस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकुल.. IMD pic.twitter.com/L4ZmSbFlrb
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 5, 2021
हे ही वाचा- Monsoon Update: यंदा देशात समाधानकारक पाऊस; दुष्काळाची शक्यता कमीच, हवामान खात्याचा सुधारित अंदाज
यावर्षी 101 टक्के पावसाचा अंदाज
मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी (1 जून) जारी केला आहे. यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरी 101 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने यावर्षी पहिल्यांदाच 36 हवामान विभागातल्या पावसाचा अंदाज सांगितला आहे. या नवीन सुधारित अंदाजानुसार, यंदा कोकणात सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Monsoon, Weather update