नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर: गेले काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. आज 25 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच मान्सून इतके दिवस भारतात सक्रिय राहिला आहे.
खरंतर, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्याच केरळात मान्सूनने दिमाखात आगमन केलं होतं. त्यानंतर दोनच दिवसात मान्सूनचा पाऊस मुंबईत येऊन धडकला होता. मान्सूनच्या सुरुवातीला कोसळलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मुंबईकरांची पुरती धांदल उडाली होती. अनेक रस्त्यावर पाणी साचून संपूर्ण मुंबईत पुरजन्य स्थिती निर्माण झाली होती.
#SWMonsoon withdrawn from entire country today on 25 Oct 2021. IMD pic.twitter.com/QatwrAWI6C
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 25, 2021
यंदा मान्सून सामान्य राहणार असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. 6 ऑक्टोबरपासून वायव्य भारतातून सुरू झालेल्य पावसाने राज्यात थैमान घातलं आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे अकोला, नाशिक परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे.
हेही वाचा-पुण्यानं लसीकरणात ओलांडला 50 लाखांचा टप्पा; पालिकेनं मोजले तब्बल एवढे कोटी
दुसरीकडे, गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या पाच दिवसांसाठी राज्यात कोणताही इशारा दिला नाही. पुढील पाचही दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात तापमानाचा पारा देखील घसरला आहे. रविवारी शहरात 16.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर लोहगाव येथे 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Monsoon, Weather forecast