30 मे : गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची आपण चातकाप्रमाणे वाट पाहत होतो, त्या पावसाचं आज अखेर केरळात आगमन झालं आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
मान्सून 30 मेच्या सुमारास केरळात दाखल होईल अशी शक्याता हवामान विभागाने 15 दिवसांपूर्वीच वर्तवली होती. एरवी साधारणत: 1 जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होते. त्यामुळे सरासरीच्या दोन दिवस आधीच मान्सून केरळात दाखल झाला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आठवडयाभराने महाराष्ट्रात दाखल होतो. मान्सूनच्या पुढील वाटचालीला पोषक वातावरण राहिली तर, येत्या 2 किंवा 3 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. या वर्षी पुरेसा पाऊस होईल, असं आयएमडीने म्हटलं आहे.
नैऋत्य मोसमी पावसाने सोमवारी दक्षिण अरबी समुद्र, मालदिव, कोमोरिन परिसर, तसंच बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम आणि पूर्वमध्य परिसरात प्रवेश केला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला असून, येत्या २४ तासांत दक्षिण कोकण, गोव्यात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
केरळातून महाराष्ट्रापर्यंतचा मान्सूनचा प्रवास :
केरळात निर्धारीत वेळेच्या दोन दिवस अगोदरच मान्सूनचं आगमन
भारतात प्रवेश करताना मान्सूनच्या दोन शाखा तयार होतात
पहिली शाखा अरबी समुद्रावरून प्रवास करत पाऊस देते
दुसरी शाखा बंगालच्या उपसागरावरून प्रवास करत पाऊस देते
महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा अरबी समुद्रावरून येतो
केरळात पोहोचलेल्या मान्सूनला महाराष्ट्रात पोहोचायला 3 ते 4 दिवस
केरळात पोहोचलेला मान्सून कर्नाटक, गोव्यातही काही वेळेस रेंगाळतो
शक्यतो महाराष्ट्रात पावसाचं आगमन कोकणातून होतं
कोकण, मुंबई असा येणारा मान्सून नंतर राज्यभर पसरतो