मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची तारीख हुकली, आता या तारखेला येणार पाऊस

मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची तारीख हुकली, आता या तारखेला येणार पाऊस

मुंबईसह महाराष्ट्रात आता 12 जूनऐवजी 17 ते 18 जूनला पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पेरणी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 7 जून : राज्यात उन्हाची तलखी कमी झाली असली तरी अजूनही पावसाची चिन्हं दिसत नाहीत. दुष्काळाच्या झळा आणि तीव्र पाणीटंचाई सोसणारी जनता पावसाकडे डोळे लावून बसली आहे. या स्थितीत पावसाबद्दल फारशी आशादायक बातमी नाही.

मुंबईसह महाराष्ट्रात आता 12 जूनऐवजी 17 ते 18 जूनला पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पेरणी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात अंदाज वर्तवल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, अशाही सूचना आहेत.

मुंबईकरांसाठी आता आपापल्या भागात कुठे आणि किती पाऊस पडेल याची विभागनिहाय माहिती मोबाईलवर मिळणार आहे. mumbaiweatherlive हे अॅप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून पावसाचे लाइव्ह अपडेट्स मिळवता येतील.

उद्या केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

श्रीलंकेत दाखल झालेला मान्सून पुढे सरकण्यासाठीचं हवामान अनुकूल असून, मान्सूनचा हाच वेग कायम राहिला तर ८ जून रोजी मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. दुसरीकडे देशासह राज्याच्या विशेषत: मुंबईच्या हवामानात बदल नोंदविण्यात येत असून, वाढती आर्द्रता मुंबईकरांना घाम फोडत आहे. गुरुवारी कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये अनुक्रमे ८१, ६५ आर्द्रता नोंदविण्यात आली असून, ३५.१ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

तुरळक ठिकाणी पाऊस

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यासह विदर्भाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, ७ आणि ८ जून रोजी मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल. ९ आणि १० जून रोजी विदर्भात उष्णतेची लाट राहील. ७ आणि ८ जून रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३५, २९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

=======================================================================================

महापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा

First published: June 7, 2019, 8:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading