चंद्रकांत पाटलांच्या मेळाव्यात छेडछाड झाली, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप

चंद्रकांत पाटलांच्या मेळाव्यात छेडछाड झाली, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप

तक्रार केल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे, 24 जुलै : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमच्यासोबत छेडछाड झाली, असा आरोप भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसंच हे प्रकरण बाहेर येऊ नये, यासाठीही काहींनी प्रयत्न केल्याचा आरोप या महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटलांना भेटण्यासाठी गेलो असता काही लोकांकडून गर्दीचा फायदा घेऊन महिला पदाधिकाऱ्यांच्या साड्यांचे पदर ओढणे, चिमटे काढणे असे गैरवर्तन झाल्याचा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. तक्रार केल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

भाजपच्या या मेळाव्यात ज्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप आहे, त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहीत झाल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे भाजपच्या मेळाव्यातील हा प्रकार आता चव्हाट्यावर आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातच हा प्रकार घडल्यानंतरही कुणावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर भाजपकडून कारवाई करण्यात येणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची पोस्ट

'नमस्कार, अतिशय संतापाने मी हा मेसेज ग्रुपवर टाकत आहे .कालच्या शिवशंकर सभागृहात आमच्या बाबतीत जो फालतू प्रकार झाला त्याचा मी जाहीर निषेध करते . काल सभागृहात अध्यक्ष मा .श्री चंद्रकांतदादांना भेटण्यासाठी आम्ही उभे होतो तेव्हा गर्दीत कुणीतरी तरी माझा पदर जोरात मुद्दाम खेचला. ही अतिशय संतापजनक बाब आहे. माझ्याबरोबर असलेल्या दुसऱ्या महिला पदाधिकाऱ्यालाही जोरात चिमटा घेतला. गर्दीत चेहरे आमच्या लक्षात आले नाहीत. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे की होता, असा प्रश्न काल मनात आला. जर महिलांची सुरक्षितता इथे जपली नाही तर काय उपयोग पक्षातील पुरुष पदाधिकाऱ्यांचा? काल आमच्या बाबतीत जे घडले ते इतर कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून मी मेसेज टाकत आहे. हा विषय आपले आमदार व सरचिटणीस बाबाशेठ यांच्या कानापर्यंत जावा हे महत्त्वाचे. आपल्या मतदारसंघात महिलांची योग्य दखल घेतलीच पाहिजे. कारण सगळ्या महिला प्रामाणिकपणे काम करतात कशाचीही अपेक्षा न ठेवता. अतिशय खेद वाटतो मला काल जो प्रकार आमच्या बाबतीत झाला तो आपल्याच मतदारसंघात. आम्ही जेव्हा प्रकार तिथे उभे असलेल्या काही मान्यवरांना सांगितला तेव्हा 'जावू दया सोडून दया. पत्रकार आहेत इथं. उगीच विषय वाढेल. पक्षाचे नाव जाईल असे सांगितले गेले. अशा मनोवृत्तीचा मला अतिशय संताप आला आहे.'

भररस्त्यात पत्नीचा छळ; केस ओढून अमानुष मारहाण, घटनेचा CCTV VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: July 24, 2019, 11:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading