NRC मुद्द्यावरून मोदी आणि शहा यांच्यात मतभेद, काँग्रेसच्या मंत्र्याचा मोठा आरोप

NRC मुद्द्यावरून मोदी आणि शहा यांच्यात मतभेद, काँग्रेसच्या मंत्र्याचा मोठा आरोप

(NRC) मुद्द्यावरून देशभरात वातावरण तापलं असून जनमत हे एनआरसीच्या विरोधात आहे

  • Share this:

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 27 डिसेंबर : राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणी(NRC)  मुद्द्यावरून देशभरात वातावरण तापलं असून जनमत हे एनआरसीच्या विरोधात आहे. एनआरसीच्या मुद्द्यावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातच मतभेद असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय.

आज अमरावतीमध्ये काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन केलं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना थोरात यांनी भाजपवर टीकास्त्र केलं.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यरत असणाऱ्या ॲक्सिस बँकेत सरकारी अधिकाऱ्यांची खाती वळवण्यात आली होती. जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त खाती ही देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीयकृत बँकेतून काढून ॲक्सिस बँकेत वळते केली होती.

यावर बोलताना थोरात यांनी आपली भूमिका मांडली. 'या प्रकरणाची आम्ही चौकशी करणार असून नेमके कुठल्या कारणासाठी खाती ट्रान्सफर केली आणि हे कशासाठी केली या प्रकरणाची चौकशी करू', असंही थोरात यांनी सांगितलं.

 CAA कायद्याच्या समर्थनासाठी भाजपची रॅली, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

दरम्यान,  CAA कायद्याच्या समर्थनासाठी भाजप आणि काही संघटनांनी संविधान सन्मान मंचच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलं होतं. भाजप प्रणित सर्व संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. पण या मोर्चाला परवानगी नाकारल्याने या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं.

या मोर्चात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेची आत्तापर्यंती भूमिका ही घुसखोरांना मुंबईतून हाकललं पाहिजे अशी होती. बाळासाहेब ठाकरे यांनीही तीच भूमिका घेतली होती. मात्र, सत्तेसाठी हपापलेल्या शिवसेनेच्या तोंडाला सत्तेमुळे कुलूप लागलंय, अशी टीकाही त्यांनी केली. सावकरांचा अपमान करणाऱ्या पक्षांना जनता माफ करणार नाही, अशी टीकाही त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केली.

फडणवीस म्हणाले,  CAAच्या मुद्यावरून काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी अप प्रचार सुरू केलाय. देशात आणि समाजात हिंसाचार व्हावा असाच त्यांचा उद्देश होता. या मुद्यावरून त्यांनी पेटवा पेटवी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आलं नाही. मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याच्या मुद्यावरूनही ते पोलिसांवर चांगलेच भडकले. हिंसाचार करणाऱ्यांना मोर्चाची परवानगी दिली जाते आणि आम्ही संविधानाचा सन्मान करणारे असताना परवानगी नाकारली जाते अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2019 08:36 PM IST

ताज्या बातम्या