मुंब्रा (ठाणे), 27 जून : मुंब्रा येथील कौसा भागात एका मुस्लीम तरूणाला तीन जणांनी मारहाण करत 'जय श्री राम' बोलण्याची सक्ती केली. याप्रकरणी तरूणाने दिलेल्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात मंगेश मुंढे (30), अनिल सुर्यवंशी (22) आणि जयदीप मुंढे (26) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
झारखंड येथे एका तरूणाला 'जय श्री राम' बोलण्याची सक्ती करत मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर आता महाराष्ट्रातही असाच प्रकार समोर आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. कौसा येथील तन्वरनगर परिसरात राहणारे फैसल खान (२५) हे रविवारी त्यांच्या ओला कारने दिवा येथील आगासन रोड परिसरात प्रवासी घेण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांची कार रस्त्यामध्ये बंद पडली.
दरम्यान, याच मार्गावरून मंगेश, अनिल आणि जयदीप हे तिघेही एका दुचाकीने जात होते. त्यावेळी मंगेशने फैसल यांना शिवीगाळ करत रस्त्यावर गाडी का उभी केली असा जाब विचारला. त्यानंतर झालेल्या बाचाबाचीत मंगेश, अनिल आणि जयदीप या तिघांनी त्यांना मारहाण केली. त्यावेळी फैसल यांनी 'अल्ला के वास्ते मुझे मत मारो, मुझे छोड दो...' असं म्हणत मारू नका अशी विनंती केली. त्यावेळी पुन्हा तिघांनी फैसल यांना शिवीगाळ करत 'तु मुसलमान है, जय श्री राम बोल' असे धमकावले. त्यानंतर फैसल यांचा मोबाईल घेऊन तिघांनी पळ काढला.
फैसल घरी आल्यानंतर त्यांनी सोमवारी याप्रकरणी तिघांविरोधात केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटकही केली होती. मात्र, सुरुवातीच्या तक्रारीत त्यांनी 'जय श्री राम' म्हणत धमकावल्याचा उल्लेख केला नव्हता. घरी आल्यानंतर त्यांनी घरी माहिती दिल्यानंतर मंगळवारी याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
झारखंडमध्ये नेमकं काय घडलं?
झारखंडमध्ये 22 वर्षाच्या मुस्लीम तरूणाला विजेच्या खांबाला बांधून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला आहे. खरसावा जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. 22 वर्षाचा तरबेज अन्सारी जमशेदपूरहून आपल्या गावी परतत होता. यावेळी त्याला चोरीच्या संशयावरून एका गावातील लोकांनी घेरलं. त्यानंतर गावकऱ्यांनी तरबेज अन्सारीला विजेच्या खांबाला बांधून जबर मारहाण केली. यावेळी त्याला जय श्री रामच्या घोषणा देण्यास देखील सांगण्यात आले. यावेळी तरूणाला बराच वेळ मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरूणाला पोलिसांनी रूग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
SPECIAL REPORT: दारूमुळे दिला लग्नाला नकार, प्रियकराचा तरुणीवर सपासप वार!