'मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष', सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

'मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष', सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना पुन्हा एकदा भाजप नेत्यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनला आहे, अशी टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

  • Share this:

प्रशांत बाग

नाशिक, 31 मे : लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' प्रचारामुळे भाजप आणि मनसेमध्ये चांगलाच सामना रंगला होता. राज ठाकरेंच्या मोदीविरोधी प्रचाराला मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी कडवी उत्तरं दिली होती.

आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना पुन्हा एकदा भाजप नेत्यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनला आहे, अशी टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. निवडणूक लढवायची नाही, राजकारणात प्रत्यक्ष भाग घ्यायचा नाही. फक्त टीका करत राहायचं हीच मनसेची ओळख बनली आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. वैयक्तिक जहरी टीका करण्यापेक्षा देशाच्या विकासासाठी बोललात तर बरं राहील, असा सल्लाही त्यांनी राज ठाकरेंना दिला.

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं ते म्हणाले. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्री होण्याआधीच भाजपमध्ये प्रवेश होईल, असं त्यांनी जाहीर केलं.

रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष कोण अशी चर्चा आहे. त्यावर, भाजपमध्ये आदेश येईल तशी नेमणूक होते, असं त्यांनी सांगितलं. मला आदेश आला तर मीही प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो, असं ते म्हणाले.

नक्षलमुक्त महाराष्ट्र

महाराष्ट्र नक्षलमुक्त करण्यासाठी मी, मुख्यमंत्री आणि केंद्रीय नितीन गडकरी यांचे प्रयत्न सुरू आहेत, असं आश्वासनही सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं. वनविभागाने राज्यात 33 कोटी झाडांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबवला जात आहे. तसंच तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या वृक्षलागवडीचं मॉनिटरिंग केलं जातंय, अशी माहिती त्यांनी दिली.

===========================================================================

VIDEO : प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेणार? काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

First published: May 31, 2019, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading