मनसेच्या एकमेव नगराध्यक्षाला हवं होतं आलिशान दालन, शिवसेनेमुळे बसावं लागलं गेटसमोर!

मनसेच्या एकमेव नगराध्यक्षाला हवं होतं आलिशान दालन, शिवसेनेमुळे बसावं लागलं गेटसमोर!

महाराष्ट्रात कुठेही मनसेची सत्ता नसली तरी गेल्या दहा वर्षांपासून खेड नगर पालिकेवर मात्र मनसेचा झेंडा डौलात फडकत आहे.

  • Share this:

चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी

रत्नागिरी, 17 डिसेंबर :  महाराष्ट्रात मनसेची एकमेव नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड नगर पालिकेच्या नागराध्यक्षांवर आपले दालन चक्क नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर थाटावं लागलं आहे.

मनसेचे राज्यातील एकमेव नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी गेल्या तीन दिवसांपासून आपल्या नागराध्यक्षपदाचा कारभार नगरपालिकेच्या प्रवेश द्वारासमोर सुरू केलं आहे.  पहिल्यांदाच असा प्रकार पाहायला मिळत असल्याने जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा देखील सुरू आहे.

महाराष्ट्रात कुठेही मनसेची सत्ता नसली तरी गेल्या दहा वर्षांपासून खेड नगर पालिकेवर मात्र मनसेचा झेंडा डौलात फडकत आहे. याचे कारण नगराध्यक्ष वैभव खेडेकर. जनतेतून भरघोस मतांनी निवडून आलेल्या वैभव खेडेकर यांनी गेल्या महिन्यात खेड नगर पालिकेतील त्यांचे दालन सुशोभित आणि त्याचे नूतनीकरण करण्यासाठी आपला ५८ ( २) चा विशेष अधिकार वापरला. तब्ब्ल २२ लाख रुपये खर्चून नागराध्यक्षांचे दालनाचे नूतनीकरणाचे काम देखील सुरू केले.

जनतेतून निवडून आलेले मनसेचे नगराध्यक्ष असले तरी सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे असल्याने शिवसेनेच्या बांधकाम सभापती नम्रता वडके यांनी या कामाला आक्षेप घेतला.

शहरात अनेक कामे निधी अभावी रखडली असताना, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना एका व्हीआयपी दालनासाठी २२ लाखाचा निधी खर्च होणे बरोबर नसल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार केली.

आता शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांच्या आलिशान दालनाच्या कामाला स्थगिती देऊन १९ डिसेंबरपर्यंत नगराध्यक्षांचे म्हणणं मागवलं आहे. नगराध्यक्षांच्या आलिशान दालनाचे सुरू असलेले काम थांबवावे लागले. शिवसेनेकडून राजकारण झाले असून आपल्याशी सुडबुद्धीने ते वागत आहेत.

तसंच त्यांच्या सत्तेत त्यांनी देखील अनेक बेकायदेशीर कामे केली आहेत. आपल्या दालनाला गळती लागली होती. शॉर्ट सर्किट झाले होते म्हणून चांगले दालन करण्याचा विचार होता.  सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून आपण दालनाचे काम करत केलं असल्याचं नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितलं.

आता खेड नगर पालिकेत शिवसेना आणि मनसे यांच्यात राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला असून  नगराध्यक्षांच्या आलिशान दालनाला विरोध केल्यानं नगराध्यक्षांनी चक्क प्रवेशद्वारासमोर आपले दालन सुरू केले आहे.

खेडच्या इतिहासात हा पहिलाच प्रकार जनतेला पाहायला मिळाला असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांचे उणेदुणे काढण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. या नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विकासाकडे जास्त लक्ष द्यावं, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 17, 2019, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading