मुंबई, 13 जानेवारी: अमेरिकन कार कंपनी टेस्लाची (Tesla) अखेर भारतामध्ये एंट्री झाली आहे. त्यामुळे टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीची भारतीयांची प्रतीक्षा संपली आहे. दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. टेस्ला कंपनीनं 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे. टेस्ला कंपनीनं त्यांचं ऑफिस सुरु करण्यासाठी बंगळुरुची (Bengaluru) निवड केली आहे. दरम्यान ही कंपनी महाराष्ट्रात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. याच मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्वीट करत शिवसेनेच्या मंत्र्यांना 'पेज 3' मंत्री संबोधले आहे आणि त्यांची 'बोलाची कढी बोलाचा भात' असल्याचं देखील म्हटले आहे. निश्चितच त्यांचा रोख मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर होता.
(हे वाचा-पुणे महापालिकेच्या तुघलकी कारभाराचा पुणेकरांना फटका! वाढणार कराचा बोजा?)
शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनी महाराष्ट्रात येईल असा विश्वास व्यक्त केला होता. टेस्लाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट देखील केले होते. हेच ट्वीट संदीप देशपांडे यांनी शेअर केलं आहे आणि त्याबरोबर टेस्ला कंपनी बंगळुरूमध्ये गेल्याची एक बातमी देखील शेअर केली आहे. यामध्ये संदीप देशपांडे यांनी असं लिहिलं आहे की, 'टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला पेज 3 मंत्र्यांना झटका, बोलाची कढी बोलाचा भात'.
टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला पेज 3 मंत्र्यांना झटका" बोलाची कढी बोलाचा भात" pic.twitter.com/tvtD9CJLXT
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 13, 2021
अखेर भारतात 'टेस्ला'ची एंट्री
बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचं ऑफिस असेल. या ठिकाणी कंपनीचा संशोधन आणि विकास (research and development) ऑफिस असेल, अशी माहिती आहे. कंपनीनं भारतामधील कामकाज पाहण्यासाठी तीन संचालकांची देखील नियुक्ती केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा (BS Yediyurappa ) यांनी कंपनीचं स्वागत केलं आहे.
टेस्लाची कारही लवकरच धावणार
भारतीय रस्त्यांवर यावर्षी टेस्ला कंपनीची इलेक्ट्रीक कार (Electric Car) धावणार आहे. भारतीय बाजारपेठेत पूर्ण तयारीसह येण्याची कंपनीची योजना आहे. त्यामुळे अगदी लगेच जानेवारी महिन्यात नव्या कारचं बुकींग सुरु होण्याची शक्यता नाही. नव्या कारच्या बुकींगसाठी मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
टेस्ला कंपनीची Tesla Model 3 ही इलेक्ट्रीक कार भारतामध्ये सर्वात प्रथम दाखल होणार आहे. ही कंपनीची सर्वात जास्त वापरली जाणारी कार असून जागतिक बाजारपेठेत 2013 साली दाखल झाली आहे. त्याचबरोबर ही टेस्लाची सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे.