मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : ठाकरे का शिंदे? दसरा मेळाव्याची भाषणं कशी झाली? मनसेचं एका वाक्यात उत्तर

Dasara Melava : ठाकरे का शिंदे? दसरा मेळाव्याची भाषणं कशी झाली? मनसेचं एका वाक्यात उत्तर

दसरा मेळाव्याची भाषणं कशी झाली? मनसेचं एका वाक्यात उत्तर

दसरा मेळाव्याची भाषणं कशी झाली? मनसेचं एका वाक्यात उत्तर

आजच्या मेळाव्यात पक्षाची पुढची वाटचाल आणि दिशा काय असेल याबाबत पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना संबोधित करुन सांगणं हे अपेक्षित होतं. पण दोन्ही बाजूने एकमेकांवर सडकून टीका-टीप्पणी करण्यात आली. याच गोष्टीचा धागा पकडत मनसेने टीका केलीय.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 5 सप्टेंबर : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा होती. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एक म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना. या दोन्ही गटाकडून आज मुंबईतल्या दोन वेगवेगळ्या मैदानांवर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन्ही गटाचा मेळावा चांगलाच गाजला. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु झालं. यावेळी ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांवर निशाणा साधला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु झालं. शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली. या दोन्ही मेळाव्यांवर मनसेची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका वाक्यात या मेळाव्यांवर प्रतिक्रिया दिलं आहे.

दसरा मेळावा म्हणजे विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसेना प्रमुखांकडून या मेळाव्याच्या प्रथेला सुरुवात करण्यात आली होती. आजच्या मेळाव्यात पक्षाची पुढची वाटचाल आणि दिशा काय असेल याबाबत पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना संबोधित करुन सांगणं हे अपेक्षित होतं. पण दोन्ही बाजूने एकमेकांवर सडकून टीका-टीप्पणी करण्यात आली. याच गोष्टीचा धागा पकडत संदीप देशपांडे यांनी टीका केली. "नुसतीच उणी, धुणी, नळ आणि भांडण, विचारही नाही आणि सोनंही नाही", अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दसरा मेळाव्यावर दिली आहे.

दरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील यांनीदेखील या दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. "भाषणासाठी कोणाला कोणावरचा 'राग' लागतो, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा 'वाघ' लागतो. राजसाहेब ते राजसाहेबच", असं म्हणत राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्तुती केली.

उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर टीकेचा बाण

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. "त्यांनी गद्दारी केली त्यावेळेला अनेकांना प्रश्न पडला होता की, अरे बापरे आता पुढे काय? पण माझ्या मनात चिंता नव्हती. कारण ज्यांनी हे कार्य सोपवलं आहे तो बघून घेईल. आज शिवतीर्थ बघून पुन्हा त्यांना प्रश्न पडला, अरे बापरे गद्दारांचं कसं होणार? इथे एकही माणूस भाडे देऊन आलेला नाही. वृद्ध, दिव्यांग लोकं आले आहेत. गावावरुन पायी चालत लोकं आहेत. तिथे एक आहे, पण इथे एकनिष्ठ आहेत. ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे. दरवर्षी परंपरेप्रमाणे आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. पण यावेळेचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता. आता कितीचा झाला? आता ५० खोक्यांचा खोकासूर आहे", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

('मंदिरं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या पण तुमची दुकानं सुरु', एकनाथ शिंदेंच धक्कादायक विधान)

"वाईट एका गोष्टीचा वाटतं आणि संतापही एका गोष्टीचा येतो की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये होतो, मी बोललो नाही तुमच्याशी, माझे बोटंही हलत नव्हते, शरीर पूर्ण पडलं होतं. ते कटप्पा, हो कटप्पा म्हणजे कट करणारे अपत्य म्हणजे कटप्पा हे कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही, आपल्यासमोर येऊच शकणार नाही. पण त्यांना कुणाला कल्पना नाही की हा फक्त उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. ही शक्ती माझ्या आई जंगदंबेने दिली आहे. त्या शक्तीशी तुम्ही पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. पण तेजाचा एक शाप असतो तो तेजाचा शाप आहे", असं उद्धव म्हणाले.

एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

"ते भाषणात मला कटप्पा म्हणाले. अरे कटप्पा पण स्वाभिमानी आणि प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. आणखी काय म्हणालात? शिवसैनिकांना त्रास देताय? अरे असं बोगस काम आम्ही करणार नाहीत. आम्ही समोरुन वार करणारे आहोत. तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसणारे नाहीत", असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं.

"तुम्ही तर तुमच्या उघड्या डोळ्यांनी आमचे शिवसैनिक जेलमध्ये गेले, तडीपार झाले, त्यांच्यावर मोक्का लागले, आनंद पवार अक्षरश: ढळाढळा रडले. त्यांचे अश्रू तुम्हाला नाही दिसले? आम्हाला काय सांगता? हे सरकार कुणावही अन्याय करणार नाही. मी जाहीरपणे पोलिसांना सांगू इच्छितो, आम्हाला कुणावरही अशाप्रकारचा अन्याय करुन पक्षामध्ये सामील करुन घ्यायचं नाही. आज एवढा लाखो लोकांचा जनसमुदाय हा साक्षी आहे. कोणी चूक केली आणि कोण बरोबर आहे, असले धंदे तुम्ही केले, आम्ही नाही करणार", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

First published:

Tags: Eknath Shinde, MNS, Sandeep deshpande, Shiv sena, Uddhav Thackeray