मुंबई, 23 मार्च : गुढी पाडव्याच्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या माहिममधली अनधिकृत मजार आणि सांगलीतल्या अनधिकृत मशिदीचा मुद्दा उपस्थित केला होता. कारवाई झाली नाही तर माहिममधल्या त्या मजारीशेजारी गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर प्रशासनाने दोन्ही ठिकाणचं अनधिकृत बांधकाम पाडलं.
माहिम आणि सांगलीमधल्या या कारवाईनंतर आता मनसेच्या रडारवर मुंब्रामधल्या अनधिकृत मशिदी आणि दर्गे आले आहेत. या अनधिकृत मशिदी आणि दर्गे हटवण्याची मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. यासाठी अविनाश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
मुंब्रा येथील डोंगरावर अशाच प्रकारे काही अज्ञातांकडून 7 ते 8 अनधिकृत दर्गे उभारल्याचा आरोप ठाणे मनसेकडून करण्यात आला आहे. या दर्ग्यांचे फोटोही अविनाश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद व दर्गे १५ दिवसात हटवा अन्यथा या ठिकाणी हनुमान मंदिर उभारू असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात राज्यभरात अनधिकृत मस्जीद,मजार आणि दर्ग्याची उभारणी होत असल्याचे म्हटले होते. या अनुषंगाने सांगली आणि मुंबुईच्या समुद्रात अशा पद्धतीने रातोरात अनधिकृत मशीद उभारल्या जात असल्याचे फोटो व व्हिडीओसहित पुरावे दाखवले. तसंच यावर अंकुश ठेवण्यात सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. याच भाषणात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं, यानंतर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीतील असलेल्या जागेवर अनधिकृत दर्गा असल्याचा आरोप केला आहे.
याच डोंगरावर मुंब्रा देवीचे मंदीर आहे. पारसिक डोंगराचा संपूर्ण भाग वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. या मंदिराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोलनाक्यापर्यंत काही लोकांकडून दर्ग्याची अनधिकृतपणे बांधकामे करण्यात आल्याचा दावा अविनाश जाधव यांनी केला आहे. या दर्ग्याची बांधकामे करण्यामागे वनविभागाची जागा हडप करण्याचा उद्देश असल्याचाही मनसेचा आरोप आहे.
या अवैध बांधकामास वनविभाग, जिल्हाधिकारी प्रशासन, वीज वितरण, ठाणे महापालिका, पाणी विभाग यांचेकडून सर्व सोईसुविधा देऊन अप्रत्यक्षपणे समर्थन दिले जात आहे का ? तसेच हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि गंभीर आहे. या जागेवर अतिक्रमण करत असलेले भूमाफिया नक्की कोण आहेत? यांना पाठीशी कोण घालत आहे? असा सवालही अविनाश जाधव यांनी विचारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray