भिवंडी, 14 ऑक्टोबर : भिवंडी-ठाणे रोडवरील कोपर-पूर्णा इथं खड्ड्यामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एक ते दीड फूट खड्ड्यात पाणी साचून तळे झाले आहे. त्यामुळे दुचाकी घसरून महिला, गर्भवती महिला, मुले, नागरिक पडून रोज अपघात होतात. तर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. त्यात रुग्णवाहिका सुद्धा अडकत आहे. याचा त्रास नागरिकांना रोजच सहन करावा लगत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी या रोडवर साचलेल्या पाण्याच्या तळ्यात उतरून जाळ्याने मासेमारी आंदोलन केले आहे.
या रस्त्यावर बाराही महिने अशीच स्थिती असताना खासदार, आमदार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि मेट्रो कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने राज्य शासनाने लक्ष देऊन नागरिकांचा जीव वाचावा अशी मागणी मनसेने केली आहे. या रोडवरील तळ्यात मासेमारी आंदोलनात संजय पांडुरंग पाटील (ठाणे जिल्हा सचिव) शिनाथ भगत (भिवंडी तालुका अध्यक्ष), संतोष म्हात्रे (वाहतूक सेना तालुका अध्यक्ष), जगदीप घरत( विभाग अध्यक्ष), शरद नागावकर ( तालुका सचिव), कुलेश तरे (माजी तालुका अध्यक्ष विध्यार्थी सेना) यांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजरी लावली आहे. त्यामुळे आधीच दुरवस्था झालेल्या रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. यामुळे वाहनचालकांना अशा रस्त्यांवर प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत अधिक तत्परतेने काम करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.