पुणे, 21 डिसेंबर : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याला (citizenship amendment act 2019) मोठा विरोध होत आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांमध्ये या कायद्याविरोधात आक्रमक आंदोलन करण्यात येत आहेत. त्यानंतर आता मनसेही एनआरसी आणि सीएएच्याविरोधात आक्रमक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज 11 वाजता पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे हे मनसेची विविध विषयांवरील भूमिका जाहीर करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन्ही नेते नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत आग्रही आहेत. मात्र या कायद्याला विरोध करत देशभरात आंदोलनं करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही भाजप वगळता इतर पक्षांनी या कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे या कायद्याबाबत आणि त्यावरून होणाऱ्या आंदोलनाबाबत काय भूमिका घेतात, याबाबतची उत्सुकता आहे.
मनसेचं लवकरच महाअधिवेशन
मनसेला आलेली मरगळ झटकून पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. लवकरच मनसेचं महाअधिवेशन होणार असून या अधिवेशनाला राज्यभरातील 1 लाख कार्यकर्ते जमा करण्याचं पक्षाचं उद्दिष्ट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 23 जानेवारीला मनसेचं हे अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे आणि फडणवीस येणार आमने-सामने
राज ठाकरे नव्या वर्षात जोमाने कामाला लागणार आहेत. त्याआधी काल मनसेची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. 'गेल्या दीड महिन्यापासून जो बिनपैशांचा तमाशा सुरू होता, त्यावर चर्चा करण्यासाठी संवाद शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. कार्यकर्त्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी आणि इतरही विषयांबाबत चर्चा करण्यात आली. इतर विषयांवर मी शनिवारी सविस्तरपणे बोलणार आहे, अशी प्रतिक्रिया पुण्यात राज ठाकरे यांनी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.