राज ठाकरेंची मनसे मैदानात उतरणार, निवडणूक लढवण्याचे संकेत

राज ठाकरेंची मनसे मैदानात उतरणार, निवडणूक लढवण्याचे संकेत

मनसेचे पदाधिकारी निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक तोंडावर असतानाच राज ठाकरे यांची मनसे मात्र ही निवडणूक लढवायची की नाही, याच संभ्रमात आहेत. मात्र आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत मनसेचे पदाधिकारी निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे.

निवडणूक जवळ आल्याने आघाडी आणि युतीच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शांत असल्याचं दिसत होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी मनसेच्या विभागप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. मनसे काही जागांवर आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. मनसेचे कार्यालय राजगड येथे राज ठाकरेंनी ही बैठक बोलवली आहे.

दरम्यान, यापूर्वी मनसे नेत्यांच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या प्रतिक्रिया राज ठाकरेंनी जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर आता विभागप्रमुखांना भेटून राज ठाकरे निवडणुकीबाबतची चाचपणी करत आहेत. मात्र मनसे निवडणूक लढणार की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

युतीचा फॉर्म्युला ठरला?

शिवसेना-भाजपने जागावाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या फॉर्म्युल्याला हिरवा कंदील दाखवला, अशी माहिती आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजप आणि मित्रपक्षांच्या वाट्याला 162 जागा मिळाल्या आहेत, तर शिवसेना 126 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सांगावा घेऊन शिवसेना नेते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतरच हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

SPECIAL REPORT: भाजपचा निवडणूक जिंकण्याचा हुकमी एक्का; महाराष्ट्रात यशस्वी होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 11:07 AM IST

ताज्या बातम्या