ठरलं! उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित राहणार

ठरलं! उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित राहणार

उद्धव ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याचं फोनवरुन राज ठाकरेंना दिलं आमंत्रण.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर:  महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अखेर संपला असून आजपासून ठाकरे पर्वाची सुरुवात होणार आहे. शिवसेनेचा आणि ठाकरे घराण्यातून पहिले मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याला मनसेचे अध्यक्ष आणि चुलत बंधू राज ठाकरे उपस्थित राहणार का? या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. राज ठाकरेंना मातोश्रीवरून सकाळी फोनवर शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे आज शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या सोहळ्या निमित्तानं दोन भावांमधील दुरावा कमी होणार का? हे पाहाणं ही महत्त्वाचं ठरणार आहे.

सत्ता संघर्षाचं नाट्य महिनाभर सुरू असताना राज ठाकरे मात्र कुठेच सहभागी झालेले दिसले नाहीत. अगदी सोशल मीडियापासून ते माध्यमांना प्रतिक्रिया देईपर्यंत राज ठाकरे अलिप्त राहिले होते. काल संध्याकाळपर्यंत त्यांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. मात्र आज सकाळी मातोश्रीवरून शपथविधी सोहळ्याचं खास आमंत्रण देण्यात आलं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू आहे. तब्बल 30 हजार खुर्च्या आज शिवाजी पार्कात लावल्या जाणार आहेत.

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून 85 किलोमीटर अनवाणी चालत विठुरायाला साकडे घालणाऱ्या शिवसैनिकाची इच्छा अखेर पूर्ण झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दाम्पत्याचा सन्मान करण्यासाठी खास निमंत्रण दिले आहे. यासोबतच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासह सुमारे राज्यातील 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातील बनाळी येथील शिवसैनिक संजय सावंत आणि त्यांच्या पत्नी रूपाली सावंत हे दोघे बनाळीपासून पंढरपूरपर्यंत अनवाणी चालत आले होते. यासाठी त्यांना तीन दिवसांचा कालावधी लागला होता. पंढरपुरात येऊन त्यांनी विठ्ठलास साकडे घातले की, 'मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा'.यानंतर त्यांनी चंद्रभागा पाण्याने भरलेला कलश आणि तुळशी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांना भेट दिली. या शपथविधी सोहळ्याचे सावंत दाम्पत्याला विशेष निमंत्रण आले आहे.

'आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु. अभिनंदन!' खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर उद्धव ठाकरेंचं केलं अभिनंदन.

First published: November 28, 2019, 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading