मुंबई, 3 फेब्रुवारी : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. महाविकास आघाडीने या निवडणुकीत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना युतीला चांगलाच धक्का दिला आहे. नागपूर आणि औरंगाबाद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. मात्र कोकणात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. या विजयामुळे कोकण भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
म्हात्रेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
या विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देत म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 'हा माझा एकट्याचा विजय नाही, हा माझ्या मतदारसंघातून संपूर्ण शिक्षकांचा विजय आहे. मी गेल्या सहा वर्षांमध्ये जे काम केलं त्याची पोचपावती मला माझ्या मतदारसंघातील शिक्षकांनी दिली. तब्बल 33 संघटनांचा आम्हाला पाठिंबा होता. मुख्यमंत्री आणि पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो' असं म्हात्रे यांनी विजयानंतर म्हटलं होतं.
पाच पैकी दोन जागा मविआला
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान झालं होतं. यामध्ये औरंगाबाद आणि नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर कोकणात भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. नाशिकमधून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी बाजी मारली आहे. अमरावतीचा निकाल अद्याप समोर आलेला नाही, मात्र अमरावतीमध्ये देखील मविआचे उमेदवार आघाडीवर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, MLC Election