पुणे, 2 फेब्रुवारी : राज्यातल्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघातून महाविकासआघाडीचे सुधाकर आडबाले विजयी झाले आहेत. आडबाले यांनी भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे अमरावती पदवीधर मतदारसंघामध्ये रणजीत पाटील हे पिछाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीअखेर महाविकासआघाडीचे धीरज लिंगाडे 1761 मतांनी आघाडीवर आहेत.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काळे यांना विक्रमी आघाडी मिळाल्यामुळे त्यांचा विजयही जवळपास निश्चित झाला आहे. तर नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांनी आघाडी घेतली आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत, त्यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला.
अजितदादांनी डिवचलं
शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या या निकालांवरून अजित पवार यांनी भाजपला डिवचलं आहे. सत्ताधारी पक्षाला विचार करावा लागणारा हा निकाल आहे, असं अजित पवार म्हणाले. 'अमरावतीमध्ये त्यांचा उमेदवार पिछाडीवर आहे. कोकणामध्ये त्यांचा विजय झाला असला तरी तो उमेदवार शिवसैनिक आहे. सत्यजीत तांबेंच्या रक्तात काँग्रेस भिनली आहे, डोळ्यात अंजन घालणारा हा निकाल आहे. बारकाईने अभ्यास करून पुढची आखणी केली पाहिजे,' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी केली.
'आमची आघाडी कोणाबरोबर आहे, तर शिवसेना काँग्रेससोबत. आमच्याबरोबर वंचितची आघाडी नाही,' हेदेखील अजित पवारांनी स्पष्ट केलं.
'हा निकाल भाजपला विचार करायला लावणारा निकाल आहे. आपण आपल्या लोकांनी हुरळून न जाता जिथे ज्यांची ताकद आहे तिथे महाविकासआघाडी म्हणून उभं राहावं,' असा सल्लाही अजित पवारांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, BJP