'विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी माझा हक्क', नेत्याच्या दाव्याने भाजपमध्ये वाढली स्पर्धा

'विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी माझा हक्क', नेत्याच्या दाव्याने भाजपमध्ये वाढली स्पर्धा

महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर भाजपमध्ये आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड, 9 डिसेंबर : 'भाजपमधील घटकपक्ष आणि भाजपा आमदार यात सर्वात जेष्ठ मीच आहे. अनुभवी मीच आहे. त्या अर्थी विरोधी पक्षनेते पदावर अधिकार माझाच आहे,' असा दावा विधानपरिषदेचे आमदार आणि शिव संग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. असं असलं तरीही विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचा याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असंही सांगायला विनायक मेटे विसरले नाहीत.

'राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर आम्ही विरोधी पक्षात आहोत. ते काम आम्ही चोखपणे बजावणार आहोत. यासाठी शिवसंग्रामच्या आमदारांना घेवून मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. तसंच आम्ही सर्व चवदार तळ्यावर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घेवून संघर्षाला सुरुवात करणार आहोत,' असं विनायक मेटे यांनी सांगितलं आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर भाजपमध्ये आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या पदासाठी विनायक मेटे यांच्यासह सुरेश धस आणि पंकजा मुंडे हे नेतेही स्पर्धेत असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे हे तीनही नेते बीड जिल्ह्यातील आहेत. सुरेश धस हे पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करत असले तरीही विनायक मेटे मात्र कायमच पंकजा यांच्यासोबत राजकीय संघर्ष करत असतात. त्यामुळे आता विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद नक्की कुणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धुळ चारत विजय मिळवला. या पराभवानंतर आता पंकजा मुंडे यांच्या राजकारणाची पुढची दिशा काय असणार, याबाबत लवकरच त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. राज्याच्या राजकारण पुन्हा सक्रीय होण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची मागणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 02:48 PM IST

ताज्या बातम्या