धनंजय मुंडे आणि आमदाार संदीप क्षीरसागर यांनी आंदोलक महिलांना झाडावरुन खाली उतरण्याची विनंती केली. विशेष म्हणजे महिलांची समजूत काढण्यासाठी, त्यांनी खाली उतरविण्यासाठी खुद्द आमदार संदीप क्षीरसागर थेट झाडावर चढले.
बीड, 26 जानेवारी : देशभरात प्रजासत्ताक दिवस (Republic Day) जल्लोषात साजरा केला जात असताना बीडमध्ये (Beed) सफाई कामगार महिलांनी थेट झाडावर चढून आंदोलन (Protest) केलं. खरंतर त्यांच्या आंदोलनामागील कारणही अगदी तसंच आहे. त्यांना गेल्या काही दिवसांपासून वेतन मिळालेलं नाही. ते वेतन मिळावं यासाठी दोन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Beed Collector office) असलेल्या झाडांवर चढून आंदोलन केलं. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिलांना झाडावर चढून आंदोलन करताना बघून त्यांना धक्काच बसला. धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी आंदोलकांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान आंदोलन प्रमुखावर धनंजय मुंडे चांगलेच संतापले. धनंजय मुंडे आणि आमदाार संदीप क्षीरसागर यांनी आंदोलक महिलांना झाडावरुन खाली उतरण्याची विनंती केली. विशेष म्हणजे महिलांची समजूत काढण्यासाठी, त्यांनी खाली उतरविण्यासाठी खुद्द आमदार संदीप क्षीरसागर थेट झाडावर चढले. आमदार क्षीरसागर यांच्या विनंती नंतर आंदोलनकर्त्या महिला खाली उतरल्या आहेत. या महिलांचा वेतनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिलं.
बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिला कामगारांच्या वेतनाचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे यापूर्वी देखील या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या झाडावर चढून आंदोलन केलं होतं. पण त्यांच्या आंदोलनाची फारसी दखल घेण्यात आली. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा झाडावर चढून आंदोलन केल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.
बीडमध्ये आपलं रखडलेलं वेतन मिळावं या मागणीसाठी बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झाडावरुन झडून आंदोलन केलं. यावेळी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर महिलांना खाली उतरविण्यासाठी झाडावर चढले #SandeepKshirsagar#Beed#RepublicDaypic.twitter.com/tTsqEiLzUy
बीड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन ठरला आंदोलन दिन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल 12 आंदोलन
दरम्यान, बीडमध्ये आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेक महिने आणि वर्षांपासून न्याय मागूनही मिळत नसल्याने, आपल्या समस्या घेऊन न्यायाची मागणी करत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल 12 आंदोलन सुरु होती. यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी करावी, वनविभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, शहीद जवानांच्या कुटुंबियांना जमिनीचे वाटप करावे, कोरोना काळात रुग्णांना दिलेल्या जेवणाचे बिल मिळावे, गायरान जमीन नावावर करून द्यावी, पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाविषयी न्याय मिळावा, पारधी समाजातील कुटुंबीयांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी आज वेगवेगळ्या नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले.
(नाराज कार्यकर्त्यांना कसं खूश करायचं?, बिझी अजित पवारांनी सांगितलं सिक्रेट)
पोलीस मुख्यालयावर मंत्री धनंजय मुंडेंसमोर, बोगस रस्त्यावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
बोगस रस्त्याविषयी कारवाई होत नसल्याने, एकाने पोलीस मुख्यालयावर झेंडा वंदनस्थळी धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी त्याने झेंड्याच्या समोरच अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. विनोद शेळके असं आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. बीड शहरातील पंचशील नगर रस्त्याचं बोगस काम झाल्याची तक्रार करुनही कारवाई झाली नाही. त्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला, असं त्याचं म्हणणं आहे. त्याने धनंजय मुंडेंसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मंत्री धनंजय मुंडेंनी याची दखल घेतलीय. ते म्हणाले, की कोणताही रस्ता एका व्यक्तीसाठी नसतो, त्यांनी चौकशीचं पत्र दिलं असतं तरी चौकशी केली असती. त्या रस्त्याची आम्ही चौकशी करु. विशेष म्हणजे ट्राय पार्टीकडून देखील चौकशी करु, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.