• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कुणीही वेगळं मत मांडू नका, एकत्र मिळून निर्णय घेऊया, सदाभाऊ खोत यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

कुणीही वेगळं मत मांडू नका, एकत्र मिळून निर्णय घेऊया, सदाभाऊ खोत यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

आपण चर्चा करुन निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे कुणीही वेगळं मत मांडू नये. कारण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय विचार करुन सर्व मिळून निर्णय घेऊ, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं.

  • Share this:
    मुंबई, 24 नोव्हेंबर : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत (ST employees salary hike) मोठी घोषणा केल्यानंतर आता कर्मचारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अनिल परब यांच्यासोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे देखील होते. त्यांनी या पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी साडेसात वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडू सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आझाद मैदानात दाखल होत भूमिका मांडली. कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी एक दिवस लागेल, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही उद्या सकाळी आपला निर्णय जाहीर करु, असं खोत यांनी स्पष्ट केलं. तसेच कुणीही वैयक्तिक मत मांडू नये, असं आवाहन यावेळी सदाभाऊ खोत यांनी कर्मचाऱ्यांना केलं.

    सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

    "मंत्री अनिल परबांची भूमिका आम्ही सविस्तर ऐकून घेतली. परबांनी दिलेला प्रस्ताव आम्ही सविस्तरपणे ऐकून घेतला. त्यानंतर आझाद मैदानावर त्यांच्या प्रस्तावावर आम्ही कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करु. आपण चर्चा करुन निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे कुणीही वेगळं मत मांडू नये. कारण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय विचार करुन सर्व मिळून निर्णय घेऊ. रात्री निर्णय झाला की सकाळी पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ", अशी भूमिका सदाभाऊ खोत यांनी मांडली. हेही वाचा : अनिल परब यांची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात थेट 5 हजारांनी वाढ

    'आम्ही विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग या संदर्भात चर्चा केलेली'

    "सरकारने गेल्या पंधरा दिवसात आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. आज सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता आम्ही कर्मचाऱ्यांशी चर्चा करु. आम्ही विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग या संदर्भात चर्चा केलेल्या होत्या. मग सरकारने आम्हाला एखादा चांगला प्रस्ताव द्या, असं सांगितलं होतं. मग आम्हीच सरकरला आम्हाला किमान सातवा वेतन आयोग मिळायला हवी. राज्य सरकारकडून या कामगारांचा पगार व्हावा. राज्य सरकारकडून जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आम्ही भूमिका मांडू शकत नाही, असं सरकारला सांगितलं होतं", अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली.

    अनिल परबांकडून पगारवाढीची घोषणा

    दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषध घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. त्यांनी पहिल्या फळीतील 1 ते 10 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात 5 हजार रुपयांच्या पगारवाढीची घोषणा केली. तसेच 10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात 4 हजारांची वाढ केली. तसेच 20 वर्ष आणि त्याहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात 2500 रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय दर महिन्याला 10 तारखेच्या आत पगार होईल, याची काळजी घेतली जाईल, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा : पगारवाढीची घोषणा केली, पण तरीही कर्मचाऱ्यांचा एल्गार सरुच, विलीनीकरणाशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका

    अनिल परब नेमकं काय म्हणाले?

    "जे कर्मचारी सेवेत एक वर्ष ते दहा वर्ष या कॅटेगिरीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 5 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मुळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार 395 जालं आहे. त्याचं पूर्ण वेतन 17 हजार 395 होतं ते आता 24 हजार 694 झालं आहे. म्हणजे 7 हजार 200 रुपयांची वाढ पहिल्या कॅटेगिरीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांमध्ये पगाराबाबत नाराजी होती. त्यांचा आक्रोश गेल्या काही दिवसांमध्ये दिसला. त्यामुळे त्यांच्या पगारात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी ही एक मोठी वाढ आहे. जवळपास 41 टक्के ही पगारवाढ करण्यात आली आहे", अशी घोषणा अनिल परब यांनी केली. "10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात आम्ही 4 हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे ज्यांचं मुळ वेतन 16 हजार होतं. त्यांचा पगार मुळ वेतनाच्या 23 हजार 40 रुपये आहे. आता वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार 800 इतका झाला आहे", अशी माहिती त्यांनी दिली. "20 वर्ष आणि त्याहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात 2500 रुपयांनी वाढ केली आहे. ज्याचं स्थूल वेतन 37 हजार 440 होतं त्याचं वेतन आता 41 हजार 40 झालेलं आहे. ज्याचं स्थूलवेतन 53 हजार 280 होतं त्याचं वेतन 56 हजार 880 होईल", असंदेखील अनिल परबांनी सांगितलं.
    Published by:Chetan Patil
    First published: