अमरावती, 8 फेब्रुवारी : शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं होतं. यानंतर आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानावर बाळासाहेबांच्या शिवसेनेने टोले लगावले. भाजपने आदित्य ठाकरे यांना थेट ठाण्यातून लढा, असं प्रतीआव्हान दिलं होतं. यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना राजीनामा देऊन ठाण्यातून लढण्याचं चॅलेंज दिलं आहे.
यानंतर आता शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना आमदार रवी राणा यांनी आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन माझ्या बडेनरा मतदार संघात आदित्य ठाकरेंनी उभं रहावे, असे आव्हान रवी राणा यांनी केले आहे. रवी राणा निवडणूक लढवायला तयार आहे, असेही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले रवी राणा -
तसेच ते म्हणाले की, ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी खासदार नवनीत राणानी देखील आव्हान दिले होते. त्यावर उद्धव ठाकरे बोलले नाहीत. आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आव्हान दिले आहे. मात्र, मुख्यमंत्री तर दूरच आधी माझ्याशी निवडणूक लढवून जिंकून दाखवा, असे खुले आव्हान आमदार रवी राणा यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातदेखील मी उभे रहायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.
हेही वाचा - 'वरळीतून उभं राहायचं नसेल तर...', आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना नवं चॅलेंज!
आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार -
आदित्य ठाकरेंच्या या आव्हानावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. 'काही जण सकाळी उठतात, खोके गद्दार बोलतात. काही लोक मला आव्हान देत आहेत. मी आमच्या लोकांना सांगितलं. मी छोटी-मोठी आव्हानं स्वीकारत नाही. मला जे आव्हान स्वीकारायचं होतं ते सहा महिन्यांपूर्वी पूर्ण केलं. जास्त इच्छा असेल तर महापालिका वॉर्डात उभे राहा,' असा टोला मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.