राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला राजीनामा, मतदानाच्या काही दिवस आधी धक्का

राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला राजीनामा, मतदानाच्या काही दिवस आधी धक्का

आऊटगोईंगने हैराण झालेल्या राष्ट्रवादीला आता मतदानाला काही दिवस बाकी असतानाच आणखी एक धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे यामध्ये भर पडत चालली आहे. अशातच निवडणूक घोषणेआधी आऊटगोईंगने हैराण झालेल्या राष्ट्रवादीला आता मतदानाला काही दिवस बाकी असतानाच आणखी एक धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे विधान परिषदचे आमदार रामराव वडकुते यांनी राजीनामा दिला आहे. विधान परिषदेच्या सभापतींकडे वडकुते यांनी आपला राजीनामा सोपवला. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रामराव वडकुते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धनगर समाजातील नेते म्हणून वडकुते यांची ओळख आहे.

निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेताना पाहायला मिळतात. तिकीट न मिळाल्यानेच राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. रामराव वडकुते हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र संधी न मिळाल्याने वडकुते हे पक्षावर नाराज होते. आता अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंगोल मतदारसंघात वडकुतेंमुळे आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होत असून 24 ऑक्टोबरला मतमोजनी होईल. त्यामुळे आता महाराष्ट्राची सत्ता कोण काबीज करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आघाडीला चितपट करत सत्ता राखण्याचं महायुतीसमोर आव्हान असणार आहे, तर युतीला धक्का देत राजकीय कमबॅक करण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

VIDEO : 'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 10:44 PM IST

ताज्या बातम्या