'शपथविधी होईपर्यंत पवार कुठे जातील, हे सांगता येणार नाही'

'शपथविधी होईपर्यंत पवार कुठे जातील, हे सांगता येणार नाही'

शिवसेनेला पाठिंबा दिलेले प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत वेगवान हालचाली होत आहे. तसंच मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार, यावर शिक्कामोर्तब करणार आहे. मात्र सत्तास्थापनेच्या या गोंधळात शिवसेनेला पाठिंबा दिलेले प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे.

'आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला तेव्हा भाजप आणि शिवसेना युती होण्याची शक्यता होती. मात्र त्यांनंतर राजकीय समीकरणं पूर्णत: बदलली आहे. आता नव्या आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. मात्र जोपर्यंत शपथविधी होत नाही तोपर्यंत शरद पवार साहेब नक्की काय करतील हे सांगू शकत नाही. पवारसाहेब अजून अजित पवारांनाच नाही समजले तर मला काय समजणार,' असं म्हणत बच्चू कडू यांनी मिश्किल हास्य केलं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चा रंगत आहे.

दरम्यान, राज्यात आज महाविकास आघाडी सत्तास्थापनेच्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी सिल्वर ओक इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत तब्बल दीड तास चर्चा केली. सत्तास्थापनेबाबत आज काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या मित्र पक्षांची बैठक दुपारी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होणार आहे.

दुसरीकडे, काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक दुपारी 1 वाजता विधानभवन इथं होणार आहे. या बैठकीला काँग्रेसच्या 44 आमदारांना बोलवण्यात आलं असून गटनेता निवडीबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी चर्चा करतील. तसंच सत्ता स्थापनेबाबत दिल्लीत झालेल्या राजकीय घडामोडीची माहिती देखील आमदारांना दिली जाईल. या सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या जातील.

गटनेतेपदासाठी काँग्रेसमधून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नाना पटोले यांसह काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. विधिमंडळ गटनेत्यांची निवड दिल्लीतून जाहीर होईल, अशी माहिती आहे. काँग्रेस विधीमंडळ गटनेत्यांच्या निवडीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शिवसेना पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 12:21 PM IST

ताज्या बातम्या