मुंबई, 15 नोव्हेंबर : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी)च्या माध्यमातून राज्यातील सहकारी संस्थाचं सक्षमीकरण करण्यात येत आहे. सहकारी संस्थांनी तयार केलेल्या उत्पादनाचं ब्रँन्डिग, पॅकेजींग आणि मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्राने ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड तयार केला आहे. या ‘महाफार्म’ ब्रॅंडचा शुभारंभ पंजाबमध्ये करण्यात आला असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
चंदीगड येथील विक्री केंद्रांवर आणि लुधियाना येथे आयोजित पंजाब मार्कफेड प्रदर्शनात ‘महाफार्म’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंजाबचे सहकार आणि कारागृह मंत्री सुखजिंदर सिंग, खासदार संजय पाटील, पंजाब मार्कफेडचे व्यवस्थापकीय संचालक वरूण रूजम, चेअरमन अमरजित सम्रा, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पोकळी, फळ तंत्रज्ञान प्रमुख चंद्रकांत माळी, सहकार मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. राजाराम दिघे, सागर पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
‘महाफार्म’ ब्रॅंडच्या शुभारंभाप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, राज्यातील सहकारी पणन व्यवस्था बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासन अटल महापणन विकास अभियान राबवत आहे. दिनांक 25 जुलै 2018 रोजी महाराष्ट्र पणन महासंघाचे (महामार्कफेड) आणि पंजाब मार्केटिंग फेडरेशन (मार्कफेड), विदर्भ पणन महासंघ आणि पंजाब मार्कफेड तसेच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि पंजाब मार्कफेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले होते. त्याचा पुढचा टप्पा म्हणून ‘महाफार्म’ ब्रॅंन्डचा शुभारंभ पंजाबमध्ये करण्यात आला असल्याचं ते म्हणाले. यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये असलेली उत्पादने जसे की, सेंद्रीय गूळ, हळद पावडर, काजू, काळा मसाला या उत्पादनाचा समावेश आहे.
पंजाब आणि महाराष्ट्र राज्यातील कृषीमाल तसेच कृषी प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीची व्यवस्था निर्माण केल्यास दोन्ही राज्यांमधील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळू शकेल. पंजाब राज्य कृषीच्या बाबतीत देशामध्ये अग्रगण्य आहे. तसेच तेथील शासनाच्या पणन महासंघामार्फत कृषीमालावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. पंजाबने केलेल्या ब्रँडिंगच्या पद्धतीचा उपयोग महाराष्ट्रातील कृषिप्रक्रिया आणि ब्रँडिंग करण्यासाठी होईल. त्यासाठी पंजाबने सहकार्य करावे असेही यावेळी देशमुख यांनी सांगितले.
धक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा?