हर्षल महाजन(प्रतिनिधी),
नागपूर, 30 जून- Youtube वर आत्महत्येचा व्हिडीओ पाहून तशीच कृती केल्याने नागपुरात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. शिखा राठोड असं मृत मुलीचे नाव आहे. नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हंसापुरी परिसरात ही घटना घडली आहे. गळफास घेण्यापूर्वी शिखा तिच्या लहान बहिणीसोबत मोबाइलवर गळफास घेण्याचा व्हिडीओ पाहत होती, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.
मोबाइलवर शिखाने दोन मुलींचा फाशी घेतानाचा व्हिडिओ बघितला. तिनं हा व्हिडिओ आपल्या आईला देखील दाखवला. त्यानंतर उत्सुकता म्हणून तिने आपल्या खोलीत गेल्यावर नायलॉनच्या दोरीने स्वतःला फाशी लावून बघितली. दरम्यान, दोरी गळ्यात टाकल्यावर स्टूलवरून तिचा पाय घसरला आणि तिच्या गळ्याला फास बसला. तिचा जागेवरच दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
चंद्रपुरात नाल्यात वाहून गेला तरुण...
दुसऱ्या एका घटनेत चंद्रपुरात एक तरुण नाल्यात वाहून गेला असून त्याचा मृतदेह सापडला आहे. नरेंद्र तुकाराम थेरे (वय-28) असं मृत तरुणाचं नाव आहे. वरोरा तालुक्यातील गिरसावळी इथे ही घटना घडली आहे. मृत तरुण हा एकार्जूना इथला रहिवासी असून वाढदिवसासाठी आशी येथे तो आत्याच्या घरी गेला होता.
सायंकाळी 7 वाजता चिकन आणण्यासाठी तो आते भावासोबत माढेळी येथे गेला होता. पण या भागात संध्याकाळी पाऊस असल्याने 2 तास माढेळी येथे थांबून नंतर ते दोघे दुचाकीने आशीकडे निघाले असता गिरसावळी जवळच्या नाल्यावरून पाणी जात होते. नरेंद्र पाण्याची पातळी पाहण्यासाठी पुलावर गेला पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरला व तो पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. नाल्यातील पाणी कमी झाल्यावर आज त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
ताडोबात मधू वाघिणीसह 3 बछड्यांचं दर्शन, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या