हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर, 5 ऑक्टोबर : राज्यभरात शाळा सुरू (School reopen) झाल्या आहेत. मात्र, शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच चंद्रपूर जिल्ह्यातून (Chandrapur district) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील तुकूम गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक भाऊराव तुमडे (Principal Bhaurao Tumade) यांनी शाळेत आलेल्या पाचव्या वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले.
शाळेचा पहिला दिवस असल्याने या शाळेत फक्त काही विद्यार्थी-विद्यार्थिनी पोहचले होते. पीडित विद्यार्थीनी इयत्ता पाचवीत शिकते. मुख्याध्यापकाने वर्गातील इतर मुलांना साफसफाईसाठी बाहेर पाठविले आणि त्या आदिवासी मुलीच्या विनयभंग केला. पीडित मुलीने ही माहिती आधी मैत्रिणींना सांगितली आणि त्यांनी पालकांना माहिती दिली. माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शाळेत पोचत मुख्याध्यापक तुमडे यांना खोलीत बंद करून पोलिसांना तक्रार केली.
पंचायत समिती बल्लारपूरचे गटशिक्षण अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांनी घटनास्थळ गाठले. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून कारवाई केली आणि जमावाला हुसकावून लावले. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शाळेतील 7 विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करत अटक केली आहे. पोलीस पोहचल्याने या गावात मोठा अनर्थ टळला. या संतापजनक घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.
कल्याणमध्ये शिक्षकाकडून 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
काही दिवसांपूर्वी कल्याण शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आला. शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. कल्याण पश्चिम परिसरात आरोपी शिक्षक आणि त्याची पत्नी हा खासगी शिकवणी घेतो. त्याच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम परिसरात एक महिला शिकवणी घेते. ही महिला काही दिवसांपूर्वी बाहेरगावी गेल्याने तिचा पती सर्व विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होता. याच दरम्यान त्याने आट वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. या घटनेनंतर एक दिवस चिमुकलीने शिकवणीसाठी जाण्यास नकार दिला आणि रडण्यास सुरुवात केली. यावेळी तिला पालकांनी विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुदर तालवाला याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कल्यामधील बाजारपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur, Crime