जळगाव, 28 नोव्हेंबर : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), तसेच शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर (Adesh Bandekar) हे आज जळगावला (Jalgaon) आले आहेत. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा मुलगा विक्रम याच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे जळगावात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे गुलाबराव पाटील यांच्या मुलाचा हळदीचा कार्यक्रम आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी वधु-वरांना आशीर्वाद देत भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बातचित करताना त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या द्विवर्षपूर्ती निमित्ताने भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार किती दिवस टिकेल? याबाबत अनेक दावे करण्यात येत आहेत. तसेच भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवरही सडकून टीका केली जात आहे. या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.
"28 नोव्हेंबर हा बेनाम दिवस असल्याचा आरोप विरोधक करतात. मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक हे म्हणत आहेत. आम्ही आमचं काम करत आहोत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आहोत. त्यामुळे कोण काय म्हणतो याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही", असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.
हेही वाचा : आठ दिवसांपासून गावात वीज नाही, शेती करायची कशी? हळहळणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा गळफास
काही दिवसांपूर्वी जळगाव महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला होता. या प्रकरणावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. "जळगावमधील नगरसेवकांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला. त्यामुळेच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर झाला. शिवसेना लोकांचे मूलभूत सुविधा आणि प्रश्न सोडवू शकते. यासाठी जळगाव महानगरपालिकेवर सत्तांतर झाले", असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
हेही वाचा : 'उद्धव ठाकरे अपघाती मुख्यमंत्री, हे विश्वासघातकी आघाडी सरकार', प्रकाश जावडेकरांच्या चौफेर टीका
महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावर उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष हे विरोधी पक्षाचे काम करतात. परंतू निवडून देणारे व सत्तेत बसवणारी ही सर्वसामान्य जनता आहे. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी जे काही कामे करण्यात आली आहे त्यावर सर्वसामान्य जनतेने समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे कोण काय बोलते याची चिंता आम्ही करत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
"महाविकास आघाडीचे सरकार हे दोन वर्षांपासून काम करत आहे. कोरोनाचे संकट असतानादेखील अतिशय नियोजन पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी या संकटावर मात केलेली आहे. त्यामुळे नियोजनाचा भाग म्हणून कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे इतरही राज्यांनी आपल्या राज्याचं अनुकरण केले आहे. खर्च अधिक उत्पन्न कमी, अशा परिस्थितीतही महाविकास आघाडीच्या माध्यमातून अधिक वेगाने विकास कामे सुरू आहेत", असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.