प्रफुल साळुंखे, मुंबई14 जानेवारी : मुंबईतल्या प्रतिष्ठेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे युवा नेते आणि राहुल गांधींचे विश्वासू मिलिंद देवरा यांचं नाव निश्चित झालं आहे. मुंबईतल्या सहा मतदार संघातल्या उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसची महत्त्वाची बैठक सोमवारी मुंबईत झाली. त्यात सर्व मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यात मिलिंद देवरा यांचं नाव एकमताने समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अवघ्या पाच मिनिटांमध्ये त्यांच्या नावावर एकमत झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
दक्षिण मुंबईतून सध्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. मिलिंद देवरा यांचे वडिल मुरली देवरा यांनी मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद दिर्घकाळ भूषवलं होत. त्यामुळं त्यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. मिलिंद देवरा यांच्याशिवाय अन्य कुणाचं नाव पुढे न आल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
त्याच बरोबर दक्षिण मध्य मुंबईतून काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांचं नावही निश्चित मानलं जात आहे. या सर्व नावांची शिफारस राज्याची समिती ही केंद्राकडे पाठवते आणि त्यानंतर निर्णय जाहीर केल जातो.
मिलिंद देवरा ह काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अंतरंग वर्तुळातले असून विश्वासू सहकारी समजले जातात. राहुल यांच्या विदेश दौऱ्यांच्या नियोजनातही त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळेही त्यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता कमीच आहे.
Special Report : मुंबई काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ?