• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • राज्यात 22 जिल्ह्यात पर्जन्यमानात 60 टक्के घट !

राज्यात 22 जिल्ह्यात पर्जन्यमानात 60 टक्के घट !

राज्यात मान्सूनच्या आगमनापासून ते आजपर्यंत अर्ध्या अधिक भागात पावसाने अत्यल्प हजेरी लावलीय. राज्यात 22 जिल्ह्यात पर्जन्यमानात 60 टक्के घट झालीये.

  • Share this:
सिद्धार्थ गोदाम, विशेष प्रतिनिधी #रुसला पाऊस  औरंगाबाद, 17 ऑगस्ट : राज्यात मान्सूनच्या आगमनापासून ते आजपर्यंत अर्ध्या अधिक भागात पावसाने अत्यल्प हजेरी लावलीय. राज्यात 22 जिल्ह्यात पर्जन्यमानात 60 टक्के घट झालीये. विदर्भातील 11 जिल्हे, मराठवाड्यातील औरंगाबाद परभणी जालना लातूर नांदेड हिंगोली, तसच उत्तर महाराष्ट्र मध्ये धुळे जळगाव या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिलंय. यंदा नासिक आणि पुणे या दोनच जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. तर राज्यातल्या कोकण आणि लगतच्या भागातील 10 जिल्ह्यात साधारण पाऊस झाल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलंय. पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यात सर्वदूर पाऊस पडल्याने, बळीराजाने मोठ्या उत्साहाने खरिपाच्या पेरण्या केल्या पण नंतरच्या जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने हातातोंडाशी आलेली पिकं वाळून गेलीत. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि नगर जिल्ह्यात मूग, बाजरी, सोयाबीनची पीकं हातची गेलीत. अमरावतीत तर तिबार पेरणी करूनही पुरेसा पाऊस न आल्याने, शेतकऱ्यांना उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवावा लागलाय. पावसाने सगळीकडेच ओढ दिल्याने बळीराजा पुरता हबकून गेलाय. आणखी आठवडाभर पावसाने अशीच ओढ दिलीतर खरिप हंगामाचं पीक हातचं जाण्याची भीती व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवरच आयबीएन लोकमतने मराठवाड्यात ग्राऊंड रिअॅलिटी चेक करण्यासाठी 'रुसला पाऊस' ही वृत्तमालिका सुरू केलीय. आमचा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतोय. जेणेकरून सरकारलाही पिकांची परिस्थिती नेमकी कशी आहे याची जाणिव होईल. मराठवाड्यात 580 शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. 1 जानेवारी 2017 ते 13 ऑगस्ट या काळात 580 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. 400 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारनं मदतीसाठी पात्र धरल्यात. तर 180 आत्महत्या प्रकरणांची सरकारनं चौकशी सुरु केलीय. मात्र पात्र 400 कुटुंबांपैकीही बहुतांश कुटुंबं अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
First published: