मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /घरी जेवत असताना पतीची पॅन्ट अचानक रक्ताने माखली, पत्नीने तपासले असता...

घरी जेवत असताना पतीची पॅन्ट अचानक रक्ताने माखली, पत्नीने तपासले असता...

केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या या फसवणुकीविरोधात या मजुराच्या पत्नीने बांदा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली

केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या या फसवणुकीविरोधात या मजुराच्या पत्नीने बांदा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली

केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या या फसवणुकीविरोधात या मजुराच्या पत्नीने बांदा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली

 सिंधुदुर्ग, 26 फेब्रुवारी : 'तुला भरपूर पैसे मिळतील', असं सांगत एका गवंडी काम करणाऱ्या शेतमजुराला फसवून आरोग्य कर्मचाऱ्याने या मजुराची एका खाजगी रुग्णालयात नसबंदी करुन घेतल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्गातल्या पाडलोस गावात घडल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, सात वर्षांपूर्वी या मजुराच्या पत्नीची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झालेली असतानाही केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या या फसवणुकीविरोधात या मजुराच्या पत्नीने बांदा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सिंधुदुर्गातल्या पाडलोस गावात प्रशांत नाईक हा तरुण गवंडी काम आणि मोलमजुरी करुन आपलं कुटुंब चालवतो. प्रशांत आणि त्याची पत्नी प्रतिक्षाला दोन मुलं आहेत. एक सहावीत आहे तर दुसरा पहिलीत. 2012 साली प्रशांतची पत्नी प्रतिक्षाची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाली. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम उदरनिर्वाहापुरती आहे. प्रशांतच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार , 25 फेबृवारीला संध्याकाळी  प्रशांत घरी आला आणि रात्री जेवताना त्याला त्रास व्हायला लागला. अचानक त्याची पॅन्ट रक्ताने माखली. म्हणून घाबरलेल्या प्रशांतच्या पत्नीने अधिक तपासून पाहिले असता प्रशांतच्या दोन्ही मांड्यांवर शस्त्रक्रियेचे घाव दिसले. प्रशांतकडे विचारपूस केली असता त्याने आपल्यावर कणकवलीत नेऊन शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं सांगितलं.

प्रशांतच्या पत्नीने पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीत असंही नमूद केलंय की, 24 फेबृवारीला पाडलोस गावाच्या जवळ असलेल्या मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक रामा आरोसकर हे दुपारी 12 वा. आमच्या घरी आले. तुमच्या पतीला गवंडीकामाचे पैसे मिळणार आहेत, तेव्हा त्यांचे आधार कार्ड आणि बँक पासबूकची मागणी केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 फेबृवारीला कामाला जातो म्हणून सांगून प्रशांत सकाळी आठ वाजता घराबाहेर पडला. त्यानंतर त्याला या आरोग्य सेवकाने आणि अन्य एका व्यक्तीने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यानंतर त्याने तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अर्ध्या  तासानंतर प्रशांतला आरोग्य विभागाच्या गाडीतून कणकवलीला डॉ. पाटकर यांच्या खाजगी दवाखान्यात  नेण्यात आलं. तिथे त्याच्याकडून वेगवेगळ्या फॉर्मवर सह्या घेण्यात आल्या. आणि भूल देऊन पोटाखालच्या भागात शस्त्रक्रीया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याला काहीही खायला प्यायला न देता संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाडलोस गावापासून दूर असलेल्या आरोसबाजार रस्त्यावर सोडण्यात आले आणि त्यानंतर एका दुचाकीस्वाराची मदत घेउन प्रशांत घरी आला. 

टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते! 

या सर्व प्रकाराबद्दल आम्ही सिंधुदुर्गचे जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिफे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली असल्याचं सांगितलं. खरंतर सिंधुदुर्गचा जन्मदर मुळातच कमी आहे. तरीही आरोग्यविभागाला कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियांचं उद्दीष्ट दिलं जातं. स्त्री वर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली तर दारिद्र्य रेषेखालील ( BPL )  स्त्रीला 600 रुपये देण्यात येतात आणि दारिद्र्य रेषेवरील ( APL ) स्त्रीला 250 रुपये मिळतात. तर पुरुष नसबंदी करण्यात आली तर त्या पुरुषाला 1450 रुपये देण्यात येतात. पण कुटुंबनियोजन हे  पूर्णपणे ऐच्छीक असून त्याबाबत कुणावरही सक्ती करता येत नाही. त्यातही जर प्रशांतच्या पत्नीची आधीच कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाली असेल तर पतीची शस्त्रक्रिया करणे हा  गुन्हा  आहे असंही आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. प्रशांतला पैशाचे आमिष दाखवण्यात आले का?  आणि तसे असेल तर त्याला किती पैशाचे आमिष दाखवण्यात आलं? प्रशांतच्या म्हणण्यानुसार, त्याला या स्कीम मधून चाळीस हजार मिळतील असं सांगण्यात आल्याचं त्याने पत्नीला सांगितलं.

प्रशांतची संमती त्याच्या इच्छेविरोधात घेतली गेली का ? या सर्व गोष्टींची चौकशी होणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यानी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलंय. दरम्यान, आरोग्य विभागाच्या या काराभाराविरोधात प्रशांतचे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून संबंधीत आरोग्य कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होउन त्याला निलंबित केलं गेले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाडलोस ग्रामस्थानी दिला आहे.

First published:
top videos