28 डिसेंबर : राज्यातला साखर उद्योग अडचणीत असल्यामुळे आज कोल्हापूरमध्ये साखर कारखानदार आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात एक बैठक झाली. पण या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय आणि तोडगा निघाला नाही उलट चंद्रकांत पाटील यांनी कारखानदारांच्या अडचणींचा आणि समस्यांचा चेंडू आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकलाय.
येत्या मंगळवारी साखर कारखानदार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घडवून देणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज साखर कारखानदारांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे 20 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा अशी मागणी करत 50 टक्के व्याज भरण्याची ही तयारी दर्शवली आहे तसंच FRP साठी जे कर्ज काढल आहे. त्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे अशीही मागणी कारखानदारांनी आज चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
राज्यातल्या कारखानदारांची पुण्यातील साखर संकुलामध्ये उद्या पुन्हा एक बैठक होणार असून त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे या सगळ्या मागण्यांचा पाढा वाचला जाणार आहे. आजच्या बैठकीला कोल्हापूर विभागातील साखर कारखानदार उपस्थित होते.