वैद्यकीय परीक्षा 10 जूनपासून; कोविडमुळे अनुपस्थित राहिल्यास काय? वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिलं उत्तर

वैद्यकीय परीक्षा 10 जूनपासून; कोविडमुळे अनुपस्थित राहिल्यास काय? वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिलं उत्तर

ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होईल असे विद्यार्थी परीक्षेस उपस्थितीत राहू शकणार नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची हिवाळी 2020 लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यावर विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 8 जून: कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) आता कमी झाल्याने सर्व सेवा, व्यवहार पुन्हा हळूहळू सुरू होऊ लागले आहेत. येत्या 10 जून पासून राज्यातील वैद्यकीय परीक्षा (Medical Examination) सुरू होत आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2020 परीक्षा 10 जून पासून सुरू होत आहेत. मात्र, या परीक्षा सुरू असताना ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्या विद्यार्थ्यांचं काय? असा प्रश्न सर्वांना पडला होता. यावर आता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी उत्तर दिलं आहे.

या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिक्षा घेण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्या बद्दल प्रयत्न मोजण्यात येऊ नयेत अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केल्या आहेत. यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होईल असे विद्यार्थी परीक्षेस उपस्थितीत राहू शकणार नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची हिवाळी 2020 लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यावर विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.

PM Modi Mentoring Yuva: तरुण लेखकांसाठी मोदींची मोठी घोषणा; 3 लाखांची स्कॉलरशिप जाहीर

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. या वैद्यकीय परीक्षेस बसणारे विद्यार्थी परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन कोणत्याही शासकीय रुग्णालय तसेच शासनमान्य कोविड रुग्णालयात स्वतःची आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य करून घेऊ शकतात, तसेच जे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात राहण्यास इच्छूक आहेत अशा विद्यार्थ्यांची वसतिगृहात वैयक्तिक अंतर राखून राहण्याची सोय करण्यात यावी. वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवणाची सोय करण्यात यावी. वसतिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण वेळोवेळी करण्यात यावे आणि सर्व प्रकारची काळजी घेऊनच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात असेही वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना कळविण्यात आले आहे.

या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या विद्यापिठाच्या परिक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Published by: Sunil Desale
First published: June 8, 2021, 10:31 PM IST

ताज्या बातम्या