शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार येणार? पवारांच्या दिल्ली वारीनंतर चर्चेला उधाण

शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार येणार? पवारांच्या दिल्ली वारीनंतर चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. यानंतर राज्यात वेगळ्या राजकीय समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता संघर्षात कोणाचं सरकार स्थापन होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजप-शिवसेनेमध्ये वाढलेला तणाव पाहता आता युतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता धुसर होताना दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना सरकार स्थापन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सरकारला काँग्रेस बाहेरून समर्थन देईल असं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींशी झालेल्या चर्चेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतचे संकेत दिले.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सरकार स्थापन करण्यावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले की, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र सरकार स्थापन करण्यासाटी तयार आहेत. काँग्रेस या सरकारला बाहेरून पाठिंबा देईल. याशिवाय काँग्रेस नेत्याकडे विधानसभेचं सभापतीपद सोपवलं जाऊ शकतं. तसेच सरकार स्थापनेसाठी 1995 मध्ये सेना-भाजपने तयार केलेला फॉर्म्युला वापरण्यात येईलं असंही सांगितलं.

सोनिया गांधी यांच्याशी चर्चेनंतर शरद पवार यांनी सांगितले होते की, भाजप-शिवसेना यांना बहुमत मिळालं आहे. सरकार स्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, अद्याप शिवसेनेकडून तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्हीसुद्धा असा कोणताच प्रस्ताव दिलेला नाही.

त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मागण्यासाठी होती असं सांगितलं जातं. मात्र या भेटीत राज्यातल्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. शिवसेनेने जी भूमिका घेतली त्यावर अमित शहा नाराज असल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलंय. मुख्यमंत्रिपदावर कुठल्याही स्थितीत तडजोड करण्यास भाजपची तयारी नाही. अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत.

EXCLUSIVE शरद पवार-सोनिया गांधी बैठकीत तयार झाला सत्ता स्थापनेचा 'प्लान'

दोन्ही नेत्यांच्या दिल्लीत भेटीगाठी सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि तो शिवतिर्थावर शपथ घेईल असं सांगितलं होतं. तसेच राज्यपालांची भेटही घेतली होती. राज्यपालांची भेट ही सदिच्छा भेट असली तरी सत्ता स्थापनेसाठी मोठा पक्ष असलेल्या भाजपला आमंत्रण द्या आणि त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही तर आम्ही सरकार स्थापन करू असंही राऊत म्हणाले होते.

निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबरला लागले. त्यामध्ये कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. 288 जागापैकी भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेसने 44 आणि इतर पक्ष आणि अपक्षांनी 28 जागा जिंकल्या. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला 145 चा बहुमताचा आकडा भाजप-सेना युतीने गाठला. मात्र त्यांच्यात सत्तेच्या वाटपावरून तणाव निर्माण झाला आहे.

गडकरी-फडणवीस आमच्यासाठी एकच, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 09:09 AM IST

ताज्या बातम्या