कोल्हापूर, 23 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पाकिस्तानाच्या भ्याड हल्ल्यात (Ceasefire violation by Pakistan) कोल्हापूरचे (Kolhapur) सुपुत्र हवालदार संग्राम पाटील (Sangram Patil) यांना वीरमरण आले. आज संग्राम पाटील यांच्यावर त्यांच्या मुळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावकऱ्यांनी आपल्या या सुपुत्राला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
जम्मू काश्मीरमधील राजुरी भागात दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात करवीर तालुक्यातील निगवे खालसा या गावातील 37 वर्षे जवान हवालदार संग्राम पाटील हे शहीद झाले होते. त्यानंतर आज त्यांचं पार्थिव गावात दाखल झाले. त्यांचं पार्थिव घरी दाखल झाल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
त्यानंतर गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातल्या हायस्कूलच्या मैदानावर त्यांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. संग्राम पाटील यांना निरोप देण्यासाठी हजारो नागरिक आज मैदानावर उपस्थित होते.
संग्राम पाटील यांच्या आठ वर्षीय मुलाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील शहीद झालेला जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार असल्याची घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
नव्या घराचं स्वप्न अधुरंच राहिलं..
संग्राम पाटील यांचं घर बांधण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. संग्राम पाटील मे महिन्यात सुट्टीवर येणार होते. दोन महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापुरात घर बांधायला देखील सुरुवात केली होती. आपलं एक छान घर असाव असं त्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न त्यांना मे महिन्यात पूर्ण करून त्यांना सरप्राइज देण्याच्या तयारीत असतानाच शहीद झाल्याची बातमी आल्यानं पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या विना घर पोरकं झाल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. तर कोल्हापुरातील दुसरा सुपुत्र गेल्यानं शोकाकूल वातावरण आहे. बेळगाव मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच मुख्य केंद्र असल्यामुळे आजही या भागातील अनेक जवान सीमेवर कार्यरत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.