कोल्हापूर, 16 नोव्हेंबर : जम्मू- काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात (Pakistani troops violated ceasefire) शहीद झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे (rishikesh jondhale martyred) यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावात ऋषिकेश यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
शहीद जवान ऋषिकेश यांचं पार्थिव आज सकाळी त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले होते. ज्यावेळी ऋषिकेश यांचं पार्थिव घरासमोर नेलं, तेव्हा ऋषिकेश यांचे आई वडील आणि बहिणीने फोडलेला टाहो पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. त्यानंतर बहिरेवाडी हायस्कूलच्या पटांगणावर ऋषिकेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील मोठ्या संख्येनं नागरिक यावेळी उपस्थितीत होते.
'ऋषिकेश जोंधळे अमर रहे' अशा घोषणा देत अखेरचा निरोप देण्यात आला.
वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी ऋषिकेश यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि लहान बहीण आहे. ते 6 मराठा रेजिमेंटचे जवान होते. राष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवल्यावर दोन वर्षापूर्वी ते भारतीय लष्करात भरती झाले होते. लॉकडाउन काळात 120 दिवस गावी राहिल्यानंतर ऋषीकेश जोंधळे हे 11 जून रोजी पुन्हा कामावर रुजू झाले होते.
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता. या गोळीबारात भारताचे 5 जवान शहीद झाले होते. तर 3 नागरिक ठार झाले होते. यामध्ये महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण आले. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले.
सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झालेले जवान ऋषीकेश जोंधळे हे अविवाहित होते. राष्ट्रीय खेळाडू असल्याने ते इंडियन आर्मीमध्ये भरती झाले. लहानपणापासून उराशी बाळगलेलं देश सेवेचं स्वप्न पूर्ण झालेलं असतानाच ऋषीकेश यांना वीरमरण आलं. ऐन दिवाळीत आपल्या सुपुत्राला गमावल्याने कोल्हापूरसह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज साश्रू नयनांनी ऋषिकेश जोंधळे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.