चारित्र्यावरून संशय.. मित्राच्या मदतीने पतीने केला पत्नीचा खून

चारित्र्यावरून संशय.. मित्राच्या मदतीने पतीने केला पत्नीचा खून

अतिशय नियोजनबद्धरित्या हा प्लॅन ठरला होता. अपघाताचा बनावही यशस्वी करण्याचे ठरले होते

  • Share this:

बीड,19 नोव्हेंबर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या मित्राच्या मदतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पतीने अपघाताचा बनाव करून अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याचे आधी भासवले. मात्र अवघ्या 12 तासांत पोलिसांनी या बनवेगिरीचा पर्दाफाश केला.

मिळालेली माहिती अशी की, आष्टी येथील या घटनेत खुनाचा कट रचणाऱ्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हाची नोंद करण्यात आली. सोनाली नितीन आवारे (साप्ते) असे मृत महिलेच नाव आहे. तर पती नितीन आवारे (साप्ते) व भाऊसाहेब धोंडे अशी आरोपींची नावे आहेत.

आष्टी शहरातील सोनाली आवारे (साप्ते) यांचा रविवारी सायंकाळी पिकअपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. परंतु, पोलिसांना घातपाताचा संशय होता. हा अपघात नसल्याचा पोलिसांचा कयास होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात खोलवर जाऊन तपास केला. चौकशीत पोलिसांचा अंदाज खरा ठरला असून संशयाची सुई सोनालीचा पती नितीनकडे गेली. अधिक चौकशीत पती, पत्नीत सातत्याने वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी नितीनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मित्र भाऊसाहेब धोंडे याच्या मदतीने आपण पत्नी सोनालीच्या खुनाची कबुली दिली. मुलगी प्रगती संदेश मुळीक हिच्या तक्रारीवरून नितीन आवारे व भाऊसाहेब धोंडे यांच्यावर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद केला.

अतिशय नियोजनबद्धरित्या हा प्लॅन ठरला होता. अपघाताचा बनावही यशस्वी करण्याचे ठरले होते. याची जबाबदारी भाऊसाहेब धोंडेने घेतली होती. त्यानेच अपघाताचा बनाव करून रविवारी सायंकाळी थेट पोलिस ठाणे गाठले व आपल्या हातून अपघात झाला असून त्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2019 09:05 AM IST

ताज्या बातम्या